नागपूर: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज कोराडी येथील महानिर्मितीच्या १९८० मेगावॅट क्षमतेच्या औष्णिक वीज प्रकल्प देशाला अर्पण करण्यात आला.
यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरनियंत्रकाच्या माध्यमातून डिजीटल कोनशिलेचे अनावरण केले. त्याआधी महानिर्मितीच्या कार्यावर आधारीत लघुचित्रफित दाखविण्यात आली. त्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नियंत्रण कक्षात प्रत्यक्ष जाऊन सुपर क्रिटीकल तंत्रज्ञानावर आधारीत अत्याधुनिक यंत्रणेची पाहणी करून माहिती जाणून घेतली.
यावेळी त्यांच्यासमवेत राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते परिवहन आणि राजमार्ग, जहाज वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय विधी न्याय व इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद, केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा, कोळसा व खनीकर्म राज्यमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा व राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार, खासदार कृपाल तुमाने आदी उपस्थित होते.
सध्यास्थितीत कोराडी येथील वीज प्रकल्पात २१० मेगावॅट संच क्र. ६ चे नुतनीकरण व आधुनिकीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. २१० मेगावॅट संच क्र. ७ पासून वीज उत्पादन सुरू आहे. तसेच राष्ट्रार्पण केलेल्या ६६० मेगावॅट क्षमतेच्या तीनही संचातून वीज उत्पादन सुरू आहे.