चंद्रपूर (Chandrapur) : गेल्या काही वर्षात राज्यातील अनेक पालिकांधील मतदानाचा टक्का घसरत चाललेला दिसून येत आहे. मतदानाबाबत नागरीकांध्ये जनजागृती व्हावी यासाठी सरकारतर्फे अनेक प्रयत्न केले जात आहेत. टिव्ही, दैनिक तसेच रेल्वे , बस स्थांनकावमध्ये जाहिरातींच्या माध्यमातूनही जनजागृती केली जाते. मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहिर करुनही तरुण मंडळी मतदान केंद्राकडे वळताना दिसत नाहीत. चंद्रपूर पालिकेसाठी उद्या मतदान होणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी चंद्रपूर पालिकेने एक नामी शक्कल लढविली आहे.
सध्या तरुणांमध्ये सेल्फीची क्रेझ जास्त आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी तरुणाईमध्ये क्रेझ असणा-या सेल्फीची शक्कल प्रशासनानं राबवायचं ठरवले आहे.
तरुणाईला मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी सेल्फी स्पर्धा घेण्याचे पालिकेने ठरविले आहे. प्रशासनानं मतदान करा सेल्फी काढा दिलेल्या व्हॉट्सऍप नंबरवर पाठवा आणि लकी ड्रॉ जिंका अशी योजना घोषित केली आहे.
मतदान करुन दिलेल्या नंबरवर आपला सेल्फी पाठविल्यावर त्यातून लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. एकूण 125 बक्षिसे या स्पर्धेत देण्यात येणार असून यात मोबाईलाची समावेश आहे. पालिकेसोबतच शहरातील हॉटेल, दुकानदार मालकही मतदान जनजागृतीसाठी पुढे सरसावले आहेत. बोटाची शाई दाखवा आणि 5 टक्के सुट मिळवा असा उपक्रम हॉटेल मालकांनी सुरु केला आहे.
तापमानाचे यंदाचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढत चंद्रपूरमध्ये 45.2 इतक्या तापमानाची नोंद करण्यात आलीय. त्यामुळे तरुणाईला मतदान केंद्रापर्यत खेचून आणण्यासाठी सेल्फी स्पर्धेसारखे प्रयत्न होत आहेत. यामूळे मतदानाच्या टक्केवारीत वाढ होईल असा चंद्रपूर पालिकेला विश्वास आहे.