नागपूर: श्वानांची नसबंदी असो किंवा ॲण्टी रॅबिजचे लसीकरण, या मोहिमेसाठी सर्वांचे सहकार्य गरजेचे आहे.पशुप्रेमी, विविध सामाजिक संस्था तसेच खासगी पशुवैद्यकीय चिकित्सकांनीदेखिल या सामाजिक प्रश्नाच्या मोहिमेत मोठ्या प्रमाणात सहभागी होणे गरजेचे आहे, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले.
बुधवारी (ता. १९ एप्रिल) मनपा मुख्यालयातील महापौर कक्ष्रात खासगी पशुवैद्यकीय चिकित्सकांसोबत, शहरातील मोकाट श्वानांची नसबंदी तसेच ॲण्टीरेबिज लसीकरण या विषयावर महापौर नंदा जिचकार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
याप्रसंगी सत्तापक्ष नेते संदीप जोशी, अतिरिक्त आयुक्त डॉ. रामनाथ सोनवणे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर,पशुचिकित्सा अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले तसेच मोठ्या प्रमाणात खाजगी पशुवैद्यकीय चिकित्सक उपस्थित होते. बैठकीत बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, मोकाट श्वानांचा प्रश्न हा अत्यंत बिकट झाला असून त्यांची नसबंदी होणे गरजेचे आहे. पशुप्रेमींच्या सूचनांची देखिल दखल घेणे क्रमप्राप्त ठरते. शहरातील लोकसंख्येचा विचार करता नागपूर शहरात मोकाट श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दरवर्षी यात सातत्याने वाढ होत असते. या पार्श्वभूमीवर तातडीने मोकाट श्वानांवर नसबंदी करुन शहरातील नागरिकांना दिलासा देणेही गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. शासन नियमांना अनुसरुन लवकरच शिबिरे घेऊन श्वानांची नसबंदी पार पाडली जाईल. एवढेच नव्हे तर शस्त्रक्रियेनंतरदेखिल तीन दिवस त्यांच्या देखभालीची जबाबदारी, औषधे आदींची जबाबदारी विविध सामाजिक संस्था, फॉर्मासिस्ट व खासगी पशुवैद्यकीय चिकित्सकांच्या मदतीने महानगरपालिका पार पाडेल. यासाठी शनिवार दिनांक २९ एप्रिल रोजी दुपारी २.३० वाजता पुन्हा सर्व अनुभवी व खासगी पशुवैद्यकीय चिकित्सक, विविध फॉर्मासिस्ट, विविध सामाजिक संस्था व पशुप्रेमींसोबत मनपा मुख्यालयात बैठक घेण्याची सूचना महापौर यांनी केली.
बैठकीला पशुवैद्यकीय चिकित्सक डॉ. हेमंत जैन, डॉ. जी.बी. चौधरी, डॉ. सचिन कुंभारे, डॉ. मिलिंद हाडगे, डॉ. सुदर्शन काकडे, डॉ. पावडे, डॉ. संदीप इटणकर, डॉ. मकरंद दीक्षित आदी उपस्थित होते. त्या सर्वांनी मनपाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली.