नागपूर (Nagpur): विविध सामाजिक व क्रीडा संघटनांसोबत अऩेक वर्षांपासून नागेश सहारे कार्य करीत आहे. त्यांनी आजवर अनेक क्रीडापटूंना घडविले आहे. ज्या कार्याची आवड आहे, त्या क्षेत्रात अधिकारिक पद मिळाल्यास त्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करता येते. याप्रकारेच नागपूर महानगरपालिकेच्या क्रीडा समितीचे सभापती नागेश सहारे क्रीडा क्षेत्रातील लखलखणारा तारा म्हणून चमकदार कामगिरी करतील, असाविश्वास भाजपा शहर अध्यक्ष तथा आमदार सुधाकर कोहळे यांनी व्यक्त केला.
मंगळवारी (ता. २५ एप्रिल) रोजी दुपारी मनपा मुख्यालयात क्रीडा समितीचे सभापती नागेश सहारे, उपसभापती प्रमोद तभाने यांचा पदग्रहण सोहळा पार पडला. प्रामुख्याने उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती अध्यक्ष संदीप जाधव, माजी सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी,महिला बालकल्याण समितीच्या सभापती वर्षा ठाकरे, वैद्यकीय व आरोग्य विशेष समितीचे सभापती मनोज चापले, शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, उपायुक्त रवींद्र देवतळे, नागपूर जिल्हा अथलेटिक्स असोसिएशनचे सचिव शरद सूर्यवंशी, क्रीडा पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर बागडे यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
व्य़ासपीठावरुन बोलताना उपमहापौर दीपराज पार्डीकर म्हणाले, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून खेळाडूंसाठी कार्य करुन शहराचे नाव राज्यात, देश-विदेशात उंचावतील असा विश्वास व्यक्त केला.
क्रीडा क्षेत्रात आई फाऊंडेनच्या माध्यमातून व विविध संस्थांच्या सहकार्याने अनेक वर्षांपासून कार्यरत असून अधिकारीक पद देऊन आपल्यावर विश्वास ठेवल्याबद्दल सभापती नागेश सहारे यांनी आमदार सुधाकर कोहळे यांचे आभार मानले. पक्षाने माझ्य़ावर ठेवलेला विश्वास मी सार्थ ठरविण्याचा प्रय़त्न करेल, तसेच आता बोलण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष कामगिरी करुन दाखवू, असे आश्वासन यावेळी नागेश सहारे यांनी दिले. याप्रसंगी मान्यवरांनी नागपूर महानगरपालिकेतर्फे क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विविध क्रीडापटूंचा वर्षातून एकवेळा जाहीर सत्कार करुन त्यांना प्रोत्साहित करावे तसेच शहरातील रिकाम्या मैदानांचा उपयोग क्रीडापटूंना व्हावा, या दिशेऩे कार्य करण्याची गरज असल्याचेही मत व्यक्त केले.
स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव म्हणाले, नागेश सहारे यांच्या रूपाने क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी हक्काचा माणूस मिळाला आहे. त्यांच्या या कार्यात निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनीही यावेळी श्री. सहारे यांना त्यांच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्यात. व्यासपीठावर उपस्थित अन्य पाहुण्यांनीही यावेळी मार्गदर्शन करीत श्री. सहारे आणि श्री. प्रमोद तभाने यांना शुभेच्छा दिल्यात. नगरसेवक धर्मपाल मेश्राम, प्रदीप पोहाणे, मनोज सांगोळे, धंतोली झोन सभापती प्रमोद चिखले, हनुमाननगर झोन सभापती भगवान मेंढे, नगरसेविका दिव्या धुरडे आदी यावेळी उपस्थित होते. आभार जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी मानले.
पहिले मानधन अनाथालयाला
क्रीडा विशेष समितीचे सभापती म्हणून पदारूढ झालेले नागेश सहारे हे मागील अनेक वर्षांपासून क्रीडा क्षेत्राच्या उत्थानासाठी कार्य करीत आहे. विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून ते नागपुरातील अविकसित भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देत आहेत. इतकेच नव्हे तर आई फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी त्यांचे पहिले मानधन हे श्री स्वामी श्रद्धानंद अनाथालयाला दान केले असल्याचे माहिती देत मंचावरील उपस्थितांनी त्यांच्या या कार्याचा गौरवोल्लेख आपल्या भाषणातून केला.