नागपूर: न्याय व्यवस्थेवर जनतेचा विश्वास कायम राहण्यासाठी नवोदित वकिलांनी अभ्यासपूर्ण व सक्षमपणे या क्षेत्रात उत्तम कार्य करावे. तसेच हा कवेळ व्यवसाय न समजता समाजसेवेचे व्रत म्हणून स्विकारतांना समाजातील वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी कटीबद्ध राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
नागपूर उच्च न्यायालयाच्या सभागृहात स्व.डॉ. पी.एल. भांडारकर यांच्या स्मृतिप्रितर्थ दिल्या जाणाऱ्या पहिल्या “बेस्ट ज्युनिअर लॉयर” या पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन विदर्भ लेडी लॉयर असोशिएशनतर्फे करण्यात आले होते. या व्यवसायामध्ये पदार्पण करणाऱ्या नवोदित वकिलांना प्रोत्साहनासाठी या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे.
व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई तसेच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महाधिवक्ता रोहीत देव, विदर्भ लेडी लॉयर असोशिएशनच्या अध्यक्ष ॲड. पद्मा चांदेकर, सचिव ॲड. रितू तालिया, उपाध्यक्ष ॲड. सुनिता चंदोदिया, ॲड. शश्मी हैदर, कोषाध्यक्ष अपर्णा मनकवडे आदी उपस्थित होते.
विदर्भ लेडी असोशिएशनतर्फे दिल्या जाणाऱ्या पहिल्या पुरस्कारासाठी उत्कृष्ट ज्युनिअर वकील म्हणूनॲड. समीर पुरुषोत्तम सोनवणे यांची तसेच आठ वर्षापर्यंतच्या गटामध्ये ॲड. श्रीमती स्वीटी भाटीया व ॲड. प्रवीण राधेश्याम अग्रवाल यांची ज्युरीतर्फे निवड करण्यात आली असून त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
नवोदित वकीलांना मार्गदर्शन करतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, नवोदित लॉयर्सला प्रोत्साहित करण्यासाठी यंदा प्रथमच या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. या पुरस्कारामुळे कौतुकाची थाप पाठीवर पडल्याने पुढील कार्य करण्याची प्रेरणा मिळते. नवोदित वकिलांनी या पुरस्कारामुळे हुरळुन न जाता भविष्यात यापेक्षाही उत्तम कामगिरी करावी. या क्षेत्रातील नवनवी आव्हाने पेलण्यासाठी तुम्ही सदैव तत्पर राहून निपक्ष: आणि पारदर्शकपणे काम करावे अशी सदिच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
वकीली हा केवळ व्यवसाय नसून हा एक आदर्श व्यवसाय आहे. यासाठी नवोदित वकिलांनी या व्यवसायाकडे केवळ अर्थाजनासाठी या व्यवसायाची निवड न करण्याचे आवाहन करताना न्यायमूर्ती भूषण गवई म्हणाले की, नवोदितांनी चांगला अभ्यास करुन प्रत्येक केस सादर केली तर भविष्यातही यशस्वी वकील म्हणून आपला नावलौकीक होईल. राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन, पंडीत नेहरु, डॉ.वल्लभभाई पटेल, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी वकीली व्यवसाय करतांनाच देशसेवाही केली आहे. त्यांचा आदर्श समोर ठेवून आपल्या व्यवसायासोबत समाज व देशासाठी काम करावे, असे आवाहन यावेळी यांनी केले.
महाधिवक्ता रोहीत देव यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. प्रारंभी विदर्भ लेडी लॉयर असोशिएशनच्या अध्यक्षा ॲड . पद्मा चांदेकर यांनी डॉ.पी.एल.भांडारकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नवोदित वकिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या पुरस्काराबद्दल माहिती दिली. तसेच सर्वांचे स्वागत केले. पुरस्कार निवड समितीच्या प्रमुख ॲड . मिरा खडतकर यांनी या पुरस्कारासाठी सहा महिने ते चार वर्षे आणि चार वर्षे ते आठ वर्षे या दोन गटातील वकिलांमधून पुरस्काराची निवड करण्यात आली आहे.
या पुरस्कारासंदर्भात बोलतांना उत्कृष्ट केस सादर करतांना न्यायालय व न्यायालयाबाहेर असलेली वागणूक तसेच न्यायालयाचे वातावरण ते अत्यंत सन्मानपूर्वक ठेवणे यावर विशेष भर देण्यात आले आहे. नवोदित वकील हे अत्यंत चांगली मेहनत घेतात त्यामुळे दर्जासुद्धा उंचावला असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. प्रारंभी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दीप प्रज्वलन करुन माजी कुलगुरु स्व.डॉ.पी.एल.भांडारकर यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण केले.
यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील सर्व न्यायाधीश जेष्ठ विधित्ज्ञ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर पुरस्कार निवड समितीसाठी सहकार्य करणारे ॲड. अनिल किलौर, ॲड. प्रकाश जयस्वाल, ॲड. उदय डबले तसेच हायकोर्ट बार असोशिएशनचे सन्मानीय सदस्य यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. इला सुदामे तर आभार ॲड. रितू कालिया यांनी मानले.