Published On : Fri, May 26th, 2017

समाजपरिवर्तनात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची : महापौर जिचकार

Advertisement


नागपूर:
स्वच्छता अभियानांतर्गत ओला आणि सुका कचरा विलगीकरण करण्यात आपला सहभाग हे राष्ट्रीय कार्य आहे. कचरा ही संपत्ती आहे, हे ओळखून प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखायला हवी. लोकांना सवय लागणे महत्त्वाचे आहे. यासाठी जनजागृती आवश्यक आहे. शिक्षक हे काम प्रभावीपणे करू शकतात. त्यामुळे १ जूनपासून सुरू होणाऱ्या ओला आणि सुका कचरा विलगीकरण प्रक्रियेत लोकसहभाग मिळविण्यासाठी अर्थात समाजपरिवर्तनातच शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

ओला आणि सुका कचरा विलगीकरण प्रक्रियेची माहिती लोकांपर्यंत पोचावी, या हेतून नागपूर महानगरपालिकेच्या वतीने मनपा शाळांतील शिक्षकांच्या कार्यशाळेचे आयोजन २६ मे रोजी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात करण्यात आले होते. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी उपमहापौर श्री. दीपराज पार्डीकर, मनपा आयुक्त अश्विन मुदगल, शिक्षण समितीचे सभापती दिलीप दिवे, अपर आयुक्त डॉ. रामनाथ सोनवणे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, स्वयंसेवी संस्थेच्या लीना बुधे, शिक्षणाधिकारी मो. फारुख अहमद, सहायक आयुक्त सर्वश्री महेश मोरोणे, आर.पी. भिवगडे, जी. एम. राठोड, राजेश कराडे, अशोक पाटील, पी. एल. वऱ्हाडे, सुभाष जयदेव, विजय हुमने, हरिश राऊत, सुवर्णा दखणे आदी उपस्थित होते.

कार्यशाळेला संबोधित करताना महापौर नंदा जिचकार पुढे म्हणाल्या, शिक्षक त्यांचे कर्तव्य प्रभावीपणे पार पाडीत असतात. परंतु जनजागृतीचे हे काम ऐच्छिक आहे. अशा कामांत शिक्षकांचा नेहमीच पुढाकार असतो. कारण कुठलेही कार्य शिक्षक हे प्रामाणिकपणे पार पाडीत असतात. स्वच्छता अभियानाचे महत्त्व हे शिक्षक अधिक चांगल्याप्रकारे पटवून देऊ शकतात. शहरातील स्वच्छ ठेवण्यासाठी स्वच्छतादूतांनी केलेले कार्य मोलाचे आहे. कुठल्याही अपेक्षेविना केलेले कार्य मोलाचे आहे. त्याचप्रमाणे समाजपरिवर्तनासाठी शिक्षक करीत असलेले कार्यसुद्धा मोलाचे ठरते. राष्ट्रीय कार्यात लोकसहभाग मिळविण्यासाठी शिक्षकांनी आपली भूमिका या कार्यातही चोखपणे पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले.

Advertisement
Wenesday Rate
Wed 25 Dec. 2024
Gold 24 KT 76,300/-
Gold 22 KT 71,100/-
Silver / Kg 88,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आयुक्त अश्विन मुदगल यांनी गुरुची महिमा सांगताना शिक्षकांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले, नागरिकांचा कचऱ्याकडे बघण्याचा दृष्टीकोन आता बदलत आहे. आपला प्रयत्न योग्य दिशेने सुरू आहे, गती संथ असली तरी उद्दिष्टापर्यंत नक्कीच पोहचू, असा विश्वास आहे. या उद्दिष्टासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. अभ्यासक्रमातील विषयाला विद्यार्थ्यांच्या मनात उतरविण्याचे दायित्त्व शिक्षकांवर असते. या विद्यार्थ्यांमधील जनजागृतीचा स्तर वाढविण्याचे कार्यसुद्धा शिक्षक करीत असतात. मुलांवर प्रभाव पडला की कुटुंबातील प्रत्येकाला चांगली गोष्ट करण्यास उद्युक्त करतात आणि अशा बालहट्टापुढे कुटुंबाला नमते घ्यावे लागते. या माध्यमातून मोठा लोकाग्रह तयार करायचा आहे. जनजागृतीच्या माध्यमातून लोकांचा सहभाग वाढविला जाऊ शकतो आणि यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच येत्या पावसाळ्यात मनपाच्या वतीने वृक्षलागवडीचा मोठा कार्यक्रमही हाती घेण्यात येत असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.


तत्पूर्वी प्रास्ताविकातून अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर यांनी ओला आणि सुका कचरा विलगीकरण मोहिमेची माहिती सादरीकरणातून दिली. अपर आयुक्त डॉ. रामनाथ सोनवणे यांनी जनजागृती कार्यक्रमाचा आराखडा सादर केला. नागपुरात असलेल्या सहा लाख कुटुंबापर्यंत मनपा शिक्षक पोहोचेन. एक शिक्षक सुमारे सहाशे कुटुंबापर्यंत पोहोचणार असून प्रत्येक कुटुंबाला माहिती देत त्यांच्याकडून एक ‘फीडबॅक’ फॉर्म भरुन घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. माहिती, शिक्षण आणि संवाद (IEC) असा उपक्रम मनपातर्फे राबविण्यात येतो आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही शिक्षकांना माध्यम बनवू इच्छितो, असेही ते म्हणाले.

प्रारंभी महापौर नंदा जिचकार, शिक्षण सभापती दिलीप दिवे, आयुक्त अश्विन मुदगल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली. महापालिकेतील विविध शाळांतील २८ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परिक्षेत यश मिळाले. त्या शाळांतील शिक्षकांचा महापौरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संचालन उपमुख्याध्यापिका श्रीमती मधु पराड यांनी केले. आभार शिक्षणाधिकारी मो. फारुख अहमद यांनी मानले. कार्यक्रमाला मनपा शाळांतील मुख्याध्यापक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


शिक्षकांनी घेतली सामूहिक शपथ

यावेळी अपर आयुक्त डॉ. रामनाथ सोनवणे यांनी उपस्थित शिक्षकांना स्वच्छतेची शपथ दिली. आजपासून आम्ही ओला आणि सुका कचऱ्याचे विलगीकरण करूनच मनपा यंत्रणेकडे सोपवू, अशी ती प्रतिज्ञा होती.

Advertisement