- भिवंडी महापालिकेत काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत
- मालेगावात समविचारी पक्षासोबत चर्चा करून सत्ता स्थापन करणार

File Pic
मुंबई : मोदी सरकारच्या तिस-या वर्धापन दिनी राज्यातील तीन पैकी भिवंडी आणि मालेगाव या दोन महापालिका निवडणुकीत काँग्रेसच्या विजयाने जनता मोदी आणि फडणवीस सरकारच्या कार्यपध्दतीवर संतुष्ट नाही हे स्पष्ट झाले असून हे निकाल भाजपची सत्तेची मस्ती उतरवणारे आहेत अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले.
राज्यातील तीन महानगरपालिकांच्या निवडणुकींचा निकाल यापेक्षा अधिक चांगल्या मुहूर्तावर येऊ शकले नसते असे म्हणत खा. चव्हाण म्हणाले की, संपूर्ण राज्यभर फडणवीस आणि मोदी सरकारच्या कार्यपध्दतीवर जनता नाराज आहे हे स्पष्ट झाले आहे. राज्यातील शेतकरी, कामगार, दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक या प्रत्येक घटकावरती या सरकारच्या कार्यपध्दतीचा दुष्प्रभाव पडलेला आहे. जाहिरातबाजी, पैसा आणि सत्तेचा प्रचंड गैरवापर, खोटी आश्वासने या माध्यमातून काही काळ जनतेची दिशाभूल करता येत असली तरी यांचा खरा चेहरा जनतेने ओळखलेला आहे.
या निकालांचा सरकारला आधीच अंदाज आला होता म्हणून सत्ता, पैसा याबरोबरच रात्रीच्या अंधारात निवडणूक आचारसंहितेचा भंग करून भिवंडीच्या तहसीलदारांची बदली करण्यापर्यंत सरकारची मजल गेली होती. भाजपचा हा पराभव म्हणजे सत्तेच्या मस्तीचा पराभव आहे. गोरगरिबांना साले म्हणणा-यांना जनतेने धडा शिकवला आहे. हे निकाल महाराष्ट्राच्या जनतेच्या विचारांची दिशा दर्शवणारे असून काँग्रेस पक्ष मध्यावधी निवडणुकीसाठी तयार आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.