नागपूर: पावसाळ्यात पाणी साचल्याने डेंगी, मलेरिया, फायलेरिया आदी संसर्गजन्य रोगराईचे प्रमाण वाढते. नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष देऊन पावसाळी आजारांपासून बचावासाठी आवश्यक उपाययोजना करा, असे निर्देश आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना आरोग्य विशेष समिती सभापती मनोज चापले यांनी दिले.
गुरुवारी मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती, स्थायी समिती सभागृहात वैद्यकीय सेवा व आरोग्य समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. प्रामुख्याने उपसभापती प्रमोद कौरती, नगरसेवक लखन येरवार, विजय चुटेले, विशाखा बान्ते, भावना लोणारे, आशा उईके, वंदना चांदेकर, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, मुख्य अभियंता विजय बनगीरवार, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल चिव्हाणे, डॉ. विजय जोशी, यांत्रिक अभियंता राजेश गुरमुळे, उद्यान अधीक्षक सुधीर माटे, कनक रिसोर्सचे कुशल विजय यांची उपस्थिती होती.
बैठकीत मनपाच्या सर्व दहनघाटांचे सौंदर्यीकरण, त्यांची देखभाल दुरुस्ती आणि आवश्यक मुलभूत सुविधांसंबंधित आढावा घेण्यासाठी लवकरच अधिकाऱ्यांसोबत दौरा करण्यात येणार आहे. त्यानंतर सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला.
नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्याच्या उद्देशाने मनपाद्वारे संचालित सर्व दवाखान्यातील रंगरंगोटी, आरोग्य सेवेवर देखरेख व नियंत्रण आरोग्य समिती करणार असल्याचेही ठरविण्यात आले. कंत्राटदाराने केलेल्या कामाची पडताळी झाल्याशिवाय त्याची देयके मंजूर करण्यात येणार नसल्याचे यावेळी सभापतींनी सांगितले. कारखाना विभागाला आवश्यक यंत्रसामुग्री आणि वाहनांबाबतचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला असून लवकरच कारखाना विभाग हायटेक होणार असल्याची माहितीही यावेळी सभापतींनी दिली. नव्याने जेसीबी वाहन मनपाच्या ताफ्यात दाखल होणार असल्याने नागरिकांच्या समस्या तत्काळ सुटतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ड्रेनेज संबंधित कामासाठी स्वतंत्र विभाग
शहरातील सिवरलाईन जुनी झाली असल्याने ड्रेनेज संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामध्येच झोनल अधिकारी आणि आरोग्य विभाग कर्मचाऱ्यांचा वेळ जातो. नगरसेवकांकडे येणाऱ्या दहा पैकी आठ समस्या ड्रेनेज आणि सिवरलाईन संबंधित असतात. याच समस्या सोडविण्यासाठी मुंबई, पुणेसारख्या मोठ्या शहरात ड्रेनेज व्यवस्थापनासाठी स्वतंत्र विभागाची निर्मिती करण्यात येते. परिणामी नागरिकांच्या समस्या वेळेत सुटतात. तसेच इतर कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण येत नाही. त्यामुळे मनपामध्येही स्वतंत्र रचना करण्यात यावी, यासाठी आवश्यक प्रस्ताव तयार करुन सादर कऱण्याच्या सूचना यावेळी सभापतींनी अधिकाऱ्यांना केल्या.