Published On : Fri, Jul 14th, 2017

कामगिरी दाखवा नाहीतर घरी जा!

Advertisement


नागपूर:
थकीत मालमत्ता आणि पाणी कर असणाऱ्या ग्राहकांसाठी मनपाने ‘अभय योजना’ आणली आहे. १७ जुलै ते ७ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणाऱ्या या योजनेचा लाभ घ्या. थकीत कर भरा आणि मालमत्तेवरील जप्तीची कारवाई टाळा, असे आवाहन करीत कामात हलगर्जीपणा करणा-या कर निरिक्षकांना आयुक्त अश्विन मुदगल यांनी कामगिरी दाखवा नाहीतर घरी जा अशा स्पष्ट शब्दात खडसावले.

नागपूर महानगरपालिकेद्वारे थकीत मालमत्ता कर व पाणी कर वसुलीसाठी ‘अभय योजना’ १७ जुलै ते ७ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त अश्विन मुदगल, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, जलप्रदाय समिती सभापती राजेश घोडपागे व अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, सहायक आयुक्त मिलींद मेश्राम, कार्यकारी अभियंता संजय गायकवाड यांनी शुक्रवारी (ता. १४) लक्ष्मीनगर व धरमपेठ झोन येथे आढावा बैठक घेतली. लक्ष्मीनगर झोन येथील बैठकीत झोन सभापती प्रकाश भोयर, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, नगरसेवक प्रमोद तभाने, झोन सहायक आयुक्त सुवर्णा दखने उपस्थित होते. धरमपेठ झोन येथे झोन सभापती रूपा राय, नगरसेविका वर्षा ठाकरे, परिणीता फुके, उज्ज्वला शर्मा, ऋतिका मसराम, नगरसेवक अमर बागडे, सुनील हिरणवार, कमलेश चौधरी, प्रमोद कौरती, झोन सहायक आयुक्त महेश मोरोणे उपस्थित होते.

आयुक्त अश्विन मुदगल यांनी दोन्ही झोनच्या कर वसुलीचा आढावा घेतला. १०० टक्के पेक्षा कमी कर वसुली खपवून घेणार नाही असा इशारा त्यांनी दिला. ७ ऑगस्ट नंतर जे थकीत कर दाते आहे त्यांची मालमत्ता लिलावात काढा असे आदेश त्यांनी यावेळी अधिका-यांना दिले. ज्या करदात्यांचे चेक अनादरित झाले त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश यावेळी आयुक्तांनी दिले. त्याचप्रमाणे ३१ ऑक्टोबर पर्यंत आपली ५० टक्के थकीत रक्कम वसूल करण्यात आली पाहिजे असे आदेश कर निरिक्षकांना दिले. प्रत्येक आठवड्याचा अहवाल सहायक आयुक्तांमार्फत माझ्याकेडे पोहचवा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

Gold Rate
Thursday 09 Jan. 2025
Gold 24 KT 77,900 /-
Gold 22 KT 72,500 /-
Silver / Kg 90,600 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

स्थायी समिती सभापती संदीप जाधव म्हणाले, ‘अभय योजना’ ही नागरिकांच्या सोयीसाठी आहे. मालमत्ता करावरील दंडाच्या रकमेवर ९० टक्के तर थकीत पाणी करावरील दंडाच्या रकमेवर १०० टक्के सवलत या योजनेअंतर्गत देण्यात येत आहे. नागरिकांनी आपली जबाबदारी समजून कराचा भरणा करावा. कर्मचाऱ्यांनीही नागरिकांना विश्वासात घेऊन या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना उद्युक्त करावे, असे निर्देश त्यांनी दिले. जो नागरिक ७ ऑगस्ट पर्यंत पाणी कर भरणार नाही त्यांचे नळाचे कनेक्शन कापावे असे आदेशही त्यांनी यावेळी दिले.

अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे यांनी अधिकाऱ्यांना या महत्त्वाकांक्षी योजनेचा प्रचार-प्रसार करण्याचे आदेश दिले.

तत्त्पूर्वी सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम यांनी ‘अभय योजने’बद्दलची माहिती दिली. १०० टक्के वसुली हे उद्दिष्ट ठेवून या योजना यशस्वी करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

Advertisement