![Sachin Kurve](https://static.nagpurtoday.in/uploads/2017/03/Sachin-Kurve-600x300.jpg)
File Pic
नागपूर: महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या नागपूर-मुंबई शिघ्रसंचार दूर्तगती मार्ग म्हणजेच महाराष्ट्र समृध्दी महामार्गासाठी शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे जिल्हयातील 14 शेतकऱ्यांनी या प्रकल्पासाठी 12.65 हेक्टर जमीन उपलब्ध करुन दिली असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली.
महाराष्ट्र समृध्दी महामार्ग जिल्हयातील हिंगणा तालुक्यातून जाणार असून या महत्त्वकांक्षी प्रकल्पाअंतर्गत 21 गावातील 28.42 किलोमीटर लांबी राहणार आहेत. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनीची संयुक्त मोजणी पूर्ण झाली असून 12.65 हेक्टर जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे संपादीत करण्यात आली आहे. संबंधित शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला म्हणून 10 कोटी 51 लक्ष 9 हजार 646 रुपयाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांकडून या महत्त्वकांक्षी प्रकल्पासाठी आवश्यक असलेली जमीन खरेदीची प्रक्रिया सुरु असून ती लवकरच पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली.
या महत्त्वकांक्षी प्रकल्पासाठी किन्ही या गावातील राम आसरे जोखुलाल साहू या शेतकऱ्यांच्या तीन सर्व्हे नंबरमध्ये 2.78 हेक्टर आर जमीन शासनाने निर्धारित केलेल्या प्रती हेक्टरी दरानुसार खरेदी करण्यात आली आहे. या संपूर्ण जमिनीचा मोबदला एकूण 1 कोटी 12 लाख 41 हजार 633 रुपये थेट बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. बोरगाव रिठी येथील कल्पना गोपालराव मिसाळ यांची 1.58 हेक्टर आर जमीन खरेदी करण्यात आली असून 65 लाख 60 हजार 780 रुपयाचा मोबदला देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे वडगाव बक्षी येथील चंदा रेवागीर गायकवाड, मंदा प्रकाश फुलझेले, सत्यभामाबाई गुलाब सोनारकर यांची 1.39 हेक्टर आर जमीन संपादीत केली असून त्यांना 81 लाख 68 हजार 705 रुपयाचा मोबदला थेट देण्यात आला आहे.
बोरगाव रिठी येथील गोपाल भगवानजी मिसाळ यांच्या दोन सर्व्हे नंबरमधील 1.24 हेक्टर आर जमीन संपादीत करण्यात आली असून त्यांना 53 लाख 52 हजार 813 रुपये अदा करण्यात आले आहे. खापरी गांधी येथील प्रदीप प्रकाशचंद रांका यांची 0.39 हेक्टर आर जमीन संपादीत करण्यात आली असून त्यांना 1 कोटी 3 लाख 41 हजार 218 रुपयाचा निधी दिला आहे. सावंगी आसोला येथील नादीरा बानो मुस्ताक नागानी, मोहम्मद अली हाजी हारुन नागानी, मोहम्मद मुस्ताक हाजी हारुन नागानी, मोहम्मद हारुन हाजी हासम नागानी व यास्मीन बानो हारुन नागानी यांची 1.65 हेक्टर आर जमीन संपादीत करण्यात आली असून त्यांना 1 कोटी 11 लाख 76 हजार 536 रुपये थेट अदा करण्यात आले आहे.
हळदगाव येथील रोशन श्रीकृष्ण तेलरांधे, सारंग प्रकाशराव दांडेकर व सौरभ प्रकाशराव दांडेकर यांची 1.01 हेक्टर आर जमीन खरेदी करण्यात आली असून यांना 49 लाख 77 हजार 413 रुपये, दाताळा येथील लक्ष्मण महादेव खाडे यांची 0.57 हेक्टर आर जमिनीचा मोबदला 1 कोटी 39 लाख 32 हजार 805 रुपये, कृष्णा वासुदेव आदमने यांच्या 0.51 हेक्टर आर जमिनीसाठी 82 लाख 87 हजार 500 रुपये तर रत्नाकर वासुदेव आदमने यांच्या 1.53 हेक्टर आर जमिनीसाठी 2 कोटी 50 लाख 70 हजार 243 रुपयाचा मोबदला त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे.