नागपूर: राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहे, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. देशाच्या स्वातंत्र्यदिनातिमित्त येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी उपस्थितांसमोर मनोगत व्यक्त करतांना चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते.
यावेळी खा.डॉ. विकास महात्मे, जि.प.अध्यक्षा निशा सावरकर, महापौर नंदाताई जिचकार, विभागीय आयुक्त अनूप कुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ.कांदबरी बलकवडे, नासुप्रचे सभापती डॉ.दीपक म्हैसेकर, मनपा आयुक्त अश्विन मुदगल, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापसिंह पाटणकर, अप्पर आदिवासी आयुक्त डॉ.माधवी खोडे, वस्त्रोद्योग संचालक संजय मीना आदी उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले की, राज्यात पाऊस नसल्यामुळे गंभीर परिस्थीती निर्माण झाली असून शासन यावर तत्परतेने उपाय योजना करीत आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी सौर पंपाद्वारे सिंचन हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत असून येत्या काळात 40 लाख शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी असलेले फिडर सौर ऊर्जेवर परीवर्तीत करुन शेतकऱ्यांना दिवसा अखंडीत विज उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, सरकारची सर्वोच्च प्राथमिकता शेतकाऱ्यांचा सर्वागींण विकास असून शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेच्या माध्यमातून देशातील आजवरची सर्वात मोठी कृषी कर्जमाफी केली आहे. कुठलेही अट न ठेवता सरसकट अशी दिड लाख रुपयापर्यतचे कर्ज माफ होणार या निर्णयामुळे जिल्हयातील 66 हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. 260 कोटी रूपयाचे कृषी मुदती कर्ज आणि 575.15 कोटी रूपयांचे पिक कर्ज एकुण 835 कोटी रूपयाचे कर्ज माफी होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले की, जगात सर्वात मोठी लोकशाही मानणारा आपला देश असून देशाला पुढे नेण्यासाठी प्रत्येकाने आपले कौशल्य, ज्ञान, कर्तव्य योग्यरित्या बजावून देशाच्या विकासाठी हातभार लावण्याचे आवाहन केले. ते पुढे म्हाणाले की, जिल्ह्यात शासन व प्रशासन योग्यरित्या काम करत असून अवैद्य धंद्याना आळा बसला असून लोकप्रतिनिधी व नागरीकांनी प्रशासनाच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहावे असेही, त्यांनी यावेळी सांगितले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली येत्या दोन वर्षात राज्यातील एकही व्यक्ती बेघर राहणार नसून प्रत्येकाला घरकुल उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी सागितले.
यावेळी पालकमंत्री बावनकुळे यांच्याहस्ते सन 2016-17 जिल्हास्तरीय संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान स्पर्धेतील प्रथम पुस्कारप्राप्त ग्रामपंचायत बनपुरी तालुका पारशिवनी 5 लक्ष रूपये, द्वितीय ग्रामपंचायत धानला, तालुका मौदा 3 लक्ष रूपये तर तृतीय पुरस्कार ग्रामपंचायात सुरादेवी 2 लक्ष रूपये तसेच विशेष पुरस्कार मध्ये स्व. आबासाहेब खेडकर स्मृती कुटुंबकल्याण पुरस्कार 25 हजार ग्रामपंचायत आलागोदी, तालुका, नागपूर, स्व. वसंतराव नाईक पुरस्कार पाणी गुणवत्ता पिण्याचे पाणी व्यवस्थापन व सांडपाणी व्यवस्थापन 25 हजार रूपये ग्रा.प. खापरी (उबगी) तालुका कळमेश्वर तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक एकता पुरस्कार 25 हजार ग्रा.प. मनोरा ता. भिवापूर यांना देण्यात आला.
उल्लेखनीय सेवेबद्दल विशेष पोलिस महानिरीक्षक प्रतापसिंह पाटणकर यांना तसेच अपर पोलीस आयुक्त गडचिरोली कॅम्प नागपूर, अंकुश शिंदे यांना राष्ट्रपती पोलिस सेवा पदक पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले.
कठीण व खडतर परिस्थितीतील कामगीरी बद्दल पोलिस निरीक्षक अजित देशपांडे, सहाय्यक फौजदार मुधोरकर, सहा. फौजदार ज्ञानेश्वर इत्तडवार, पोलीस हवालदार गोविंद काकडे, नानय पोलिस शिपाई सतीश पाटील यांना विशेष सेवा पदके देवून गौरवण्यात आले.
नागपूर जिल्हयातील ISO प्रमाणपत्र प्राप्त शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रम शाळा बेलदा ता. रामटेकचे मुख्यध्यापक एन.एल.भासकरे यांचा गौरव करण्यात आला. तसेच जिल्हधिकारी कार्यालयातील गनर निलेश घोडे यांचाही पालकमंत्र्याच्या हस्ते गौरव करण्यात आला.
जिल्हा माहिती कार्यालयाद्वारे तयार करण्यात आलेल्या आपला जिल्हा नागपूर या पुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले.
यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर यांनी उपस्थित स्वातंत्र्य सेनानी, लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरीक तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांना भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात भारतीय स्वातंत्र्यदिनाचा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर सशस्त्र पोलीस दलाची मानवंदना स्विकारली.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी के.एन.के.राव, उपजिल्हाधिकारी तथा स्वागत अधिकारी प्रकाश पाटील तसेच वरिष्ठ महसूल अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उच्च न्यायालयाच्या नागपूर (खंडपीठ) न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी ध्वजारोहण कार्यक्रमाला न्यायालयातील इतर न्यायमूर्ती, वकील, अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
जिल्हा न्यायालयामध्ये ध्वजारोहण
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा न्यायालयाच्या प्रांगणात प्रमुख सत्र व जिल्हा न्यायाधीश व्ही. डी. डोंगरे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी ध्वजारोहण कार्यक्रमाला न्यायालयातील न्यायमूर्ती, वकील, अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.