नागपूर: शारिरीक अपंगत्व असले तरी खंत न बाळगता अपंगत्वावर मात करून यशाचे शिखर काबीज करा. असे आवाहन विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव कुणाल जाधव यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व स्नेहांगण अपंग मुलांची शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने मनोरूग्ण आणि मानसिक अपंग व्यक्तींकरिता योजना 2015 विषयावर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्नेहांगणातील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना ते बोलत होते.
यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य ॲड. राजेंद्र राठी, ॲड. सुरेखा बोरकुटे, ॲड. एस. आर. गायकवाड, स्नेहांगण अपंग मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक गिरीष वऱ्हाडपांडे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना कुणाला जाधव म्हणाले की, मनात बाळगलेली जिद्द अनेकदा गंभीर आव्हानांन पुढे कमकुवत ठरते. त्यामुळे जीवनात यश मिळवू शकत नाही पण अशा अपयशाने खचून न जाता जिद्दीने अभ्यास करा. दिव्यांगाकरिता शासनाच्या विविध योजना आहे. या योजनांचा पालकांनी पुढाकार घेवून लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
ॲड. सुरेखा बोरकुटे म्हणाल्या की, न्यायालय प्रत्येकाला न्याय मिळवून देण्याकरिता आहे. त्याकरिता कायदे अस्तित्वात आले आहे. कायद्याची माहिती असल्यास आपले संरक्षण आपणच करू शकतो. त्याकरिता चांगले शिक्षण घेवून स्वावलंबी बना. असही त्यांनी यावेळी सांगितले.
ॲड. राजेंद्र राठी म्हणाले की, सर्वांना जगण्याचा समान अधिकार घटनेने दिला आहे. त्यामुळे विकलांग विद्यार्थ्यांनी आपण अपंग असल्याची खंत न बागळता स्वाभिमानाने जीवन जगावे आणि पालकांनी मुलांच्या हक्काविषयी जागृत राहून त्यांना त्यांचे हक्क मिळवून दिले पाहिजे. असा सल्ला त्यांनी यावेळी पालकांना दिला.
यावेळी ॲड. एस.आर. गायकवाड यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन मृणाली देशमुख यांनी केले. कार्यशाळेला पालक,शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.