औरंगाबाद: डाॅ.बाबासाहेब अांबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय प्रवेश पद्धतीचा गुरुवारी पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे चित्र होते. पीजी-सीईटीनंतरच्या दोन फेरीतील प्रवेश संख्या त्यानंतर रिक्त जागांची प्रशासनाकडे अाकडेवारी नव्हती. तरीही प्रशासनाने स्पाॅट अॅडमिशनच्या नावाखाली उस्मानाबाद, जालना, बीड अाणि अौरंगाबाद जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना विनाकारण कँपसमध्ये बोलावून घेतले. एक तर विभागात मनुष्यबळाची वानवा आणि विद्यार्थ्यांची गर्दी नियंत्रणात अाली नसल्याने कुलगुरू डाॅ. बी. ए. चोपडे यांनी केंद्रीय प्रवेश रद्द केल्याची घोषणाच करून टाकली. अाता ३१ अाॅगस्टपर्यंत महाविद्यालयांना थेट प्रवेशाचे अधिकार दिले अाहेत.
व्यवस्थापन परिषदेच्या ठरावानुसार विद्यापीठाने १० जुलै रोजी १८ हजार ६५३ विद्यार्थ्यांची पीजी-सीईटी घेतली. यंदा पहिल्यांदाच विद्यापीठाने केंद्रीय पद्धतीची प्रवेश प्रक्रिया राबवून महाविद्यालयांना पदव्युत्तर प्रथम वर्षासाठी विद्यार्थी देण्याचे नियोजन केले होते. प्रत्यक्षात सीईटी झाल्यानंतर महिना उलटला तरीही प्रवेशाचे घोडे एक इंचही पुढे सरकलेले नव्हते. कुलगुरूंनी दिलेल्या माहितीनुसार १२ अाॅगस्टला पहिली फेरी तर १६ अाॅगस्टला दुसऱ्या फेरीतील प्रवेश पूर्ण केलेले होते. पण महाविद्यालयांना प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांच्या याद्याच पाठवल्या नाहीत, किंवा संकेतस्थळावर अपलोडही केल्या नाहीत, असेही त्यांनी म्हटले. विद्यापीठाने बाेलावल्यामुळे रसायनशास्त्र, मानव्यविद्या शाखेच्या इमारत परिसरात तर अक्षरशः यात्रा भरलेली होती.
गणित, भौतिकशास्त्र, विधी, वनस्पतिशास्त्र अादींसह किमान ४२ विविध विभागांत स्पाॅट अॅडमिशनला केवळ नोंदणीसाठी विद्यार्थी अाले होते. दिवसभर नोंदणीची प्रक्रिया सुरूच राहिली, तरीही परिस्थिती नियंत्रणात अाली नाही. शिवाय काही विभागांत तर रात्री देखील विद्यार्थ्यांची गर्दी होती. दरम्यान, रसायनशास्त्र विभागात तर विद्यार्थ्यांची झुंबड उडाली होती. माजलगाव येथून चार बस भरून विद्यार्थी प्रवेशासाठी अालेले होते. त्याशिवाय विविध खासगी वाहनांचीही गर्दी वाढलेली दिसून अाली. सायंकाळी ७.४५ वाजता काही विद्यार्थ्यांनी दगडफेक केल्याची माहिती अाहे. बाहेर उभ्या असलेल्या काही कारच्या काचाही फोडल्या होत्या. अचानक उद्भवलेल्या कायदा अाणि सुव्यवस्थेच्या प्रश्नांमुळे पोलिसांनी रात्री अाठ वाजता घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर पोलिस बंदोबस्त वाढवल्याची माहिती अाहे. पोलिस उपायुक्त विनायक ढाकणे, बेगमपुरा ठाण्याचे पोलिस निरीक्षक वसीम हाश्मी अादींनी विद्यार्थी अाणि विद्यापीठातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. दरम्यान विद्यार्थ्यांनी घातलेल्या गोंधळाच्या संदर्भात पोलिस ठाण्यात काहीच नोंद नाही. गणित विभागाच्या प्रवेशासाठी अालेल्या किमान दोनशे जणांनी सायंकाळी कुुलगुरूंशी चर्चा केली.
अामदार सतीश चव्हाण यांच्या सर्व सूचना मान्य
पदवीधर अामदार सतीश चव्हाण यांनी सायंकाळी चार वाजता कुलगुरूंची भेट घेऊन पीजी प्रेवशातील गोंधळाची स्थिती दूर करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. शिवाय केंद्रीय प्रवेश पद्धत रद्द करून महाविद्यालयांना प्रवेशाचे अधिकारही देण्याच्या मागणीचे निवेदन त्यांनी दिले होते. व्यवस्थापन परिषदेेच्या बैठकीत सुमारे दीड तास त्यांनी कुलगुरू, प्रभारी कुलसचिव डाॅ. प्रदीप जब्दे, विशेष कार्यासन अधिकारी डाॅ. वाल्मीक सरवदे, प्रभारी अधिष्ठाता डाॅ. संजय साळुंके, डाॅ. दिलीप खैरनार यांच्याशी चर्चा केली. कुलगुरूंनीही चव्हाण यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर सहमती दर्शवत केंद्रीय प्रवेश पद्धत रद्द केल्याचे जाहीर केले.
चूक झाली, कारवाई नाही
अाधीचे प्रभारी अधिकारी डाॅ. सतीश पाटील यांनीच हा गोेंधळ करून ठेवल्याचे चव्हाण यांनी सांगितले. कुलगुरूंनीही त्यांच्या मताशी सहमती दर्शवली. त्यांनी अाणि अधिष्ठातांनी सतत चुकीची माहिती दिल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली अाहे. त्यामुळे चव्हाण यांनी समिती स्थापून कारवाईची मागणी केली होती. पण कुलगुरूंनी प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी कारवाईची गरज नसल्याचे स्पष्ट केले.
विद्यार्थी संघटना प्रशासनाच्या मदतीला
हजारोविद्यार्थ्यांना पीजी प्रवेशासाठी मदत करण्यासाठी विद्यापीठाने प्रवेशद्वारापासून ते प्रशासकीय इमारत परिसरापर्यंत विविध स्टाॅल उभारले होते. ही व्यवस्थाही कमी पडल्यामुळे एसएफअायने स्वतंत्र मदत केंद्र उभारले होते. त्याशिवाय डाॅ. अांबेडकर पुतळ्याजवळ एबीव्हीपीनेही मदत केंद्र सुरू केले होते. एअायएसएफने गोंधळाच्या स्थितीतून मार्ग काढण्यासाठी कुलगुरू दालनासमोर रात्री अाठ वाजता अांदोलन केले. यामध्ये राज्याध्यक्ष पंकज चव्हाण, अय्याज शेख, अनिकेत देशमुख, विकास गायकवाड, संदीप पेडे, रतन गायकवाड, संतोष जाधव, जयश्री शिर्के अादींचा सहभाग होता.
३१ ऑगस्टपर्यंत आता थेट प्रवेश
कुलगुरूंच्यानिर्देशानुसार विशेष कार्यासन अधिकारी डाॅ. सरवदे यांच्या सहीने परिपत्रक जारी केले. या परिपत्रकाच्या मसुद्यातच पीजी प्रवेशामध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याचे मान्य केले अाहे. त्याशिवाय महाविद्यालयांनी यापुढील प्रवेश प्रक्रिया राबवावी. त्यासाठी ३१ अाॅगस्टपर्यंतची मुदत दिलेली अाहे. त्यानंतर लगेच प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांची यादी पदव्युत्तर विभागात देण्याचे नमूद केले अाहे.
> २४ अाॅगस्ट रोजी स्पाॅट अॅडमिशनच्या नावाखाली उस्मानाबाद, बीड, जालना अाणि औरंगाबाद जिल्ह्यातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना कँपसमध्ये बोलावून घेतले.
> सकाळी नऊ पासूनच विद्यापीठ परिसर गर्दीने फुलून गेले होते. बस, टेंपो, कार, दुचाकी मिळेल त्या वाहनाने विद्यार्थ्यांनी विद्यापीठ गाठले.
> विविध विभागांत मनुष्यबळाची कमतरता अाणि विद्यार्थ्यांच्या गर्दीमुळे पीजी प्रथम वर्षाच्या प्रवेशाचा पुरता बोजवारा उडाला होता. त्यामुळे गोंधळ झाला.
– २१,९८१ पीजी प्रथम वर्षाच्या जागा
– १८,६५३ विद्यार्थ्यांनी दिली सीईटी
– १०,००० जणांची धाव विद्यापीठाकडे
– ६,००० जागा रिक्त राहणे शक्य
– ५,६३६ दोन याद्यांनुसार प्रवेश झाले