नागपूर : समाजातील गरीब विधवा 19 महिलांना पारसमल पगारीया फाउंडेशनच्या माध्यमातून दुग्धव्यवसायासाठी रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली असून, महिलांनी संधीचे सोने करुन आपला विकास साध्य करावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांनी आज केले.
कवडस दत्तक घेतलेल्या गावात आज अमृता फडणवीस यांच्या हस्ते 19 विधवा व निराधार महिलांना म्हशींचे वाटप, बहुउपयोगी वाहन लोकार्पण सोहळा, स्कुल डिझीटलायझेशन (चेक वाटप) वॉटर एटीएम लोकार्पण तसेच सार्वजनिक तलाव लोकार्पण कार्यक्रम झाला त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार समीर मेघे, सरपंच मनिषा गावंडे, पंचायत समिती सदस्य राजेंद्र वाघ, जिल्हा परिषद सदस्या वंदना पाल, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गोतमारे, मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकारी आशा पठाण, तहसिलदार प्रताप वाघमारे, गट विकास अधिकारी एम.बी.जुवारे उपस्थित होते.
अमृता फडणवीस पुढे म्हणाल्या की, कवडस गावाचा सर्वांगिण विकासासाठी आपण प्रयत्नशील असून गावातील महिलांना जास्तीत जास्त रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यावर आपला भर आहे. महिलांनी आपल्या मुलांना रोज शाळेत पाठवावे. कारण शिक्षणामुळेच विकास साध्य होणार आहे.
त्या म्हणाल्या की, गावातील निराधार महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या म्हणून म्हशी उपलब्ध करुन दिल्या असून दुग्धव्यवसाय करुन भविष्यात महिला स्वावलंबी होवू शकतात. गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. एकजुटीने गावाचा विकास साध्य होतो, असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी खासदार डॉ. विकास महात्मे म्हणाले की, गावकऱ्यांनी विकासासाठी एकजुट दाखवून सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.
आमदार समीर मेघे म्हणाले की, कवडस गाव दत्तक घेतल्यापासून गावाचा नकाशा बदलला असून राहिलेले विकासाची कामे भविष्यात पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करु असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन तहसिलदार प्रताप वाघमारे यांनी तर आभार गट विकास अधिकारी एम.बी.जुवारे यांनी मानले. या कार्यक्रमास लाभार्थी महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.