नागपूर : विदर्भ विकास मंडळाचे सन 2017-18 या वित्तीय वर्षातील दुसरी नियमित बैठक आज विदर्भ विकास मंडळाच्या सभागृहात अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त अनूप कुमार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी विदर्भ विकास मंडळाचे तज्ज्ञ सदस्य ॲड. मधुकरराव किंमतकर, डॉ. कपिल चांद्रायन, डॉ. रविन्द्र कोल्हे, डॉ. किशोर मोघे तसेच विदर्भ विकास मंडळाचे सदस्य सचिव तथा अपर आयुक्त श्रीमती डॉ. निरुपमा डांगे, सह संचालक अरविंद देशमुख, उपायुक्त नियोजन बी. एस. घाटे, प्रशासकीय अधिकारी श्रीमती मेघा इंगळे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त अनूप कुमार यांच्याकडे पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठाचा कुलगुरुंचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. या अनुषंगाने विदर्भातील गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसाय विकासाचा कृती आराखडा, अहवाल लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. यासंबंधी या अहवालाची सद्य:स्थिती जाणून घेवून पुढील नियोजन व संबंधित कार्यवाही करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर तसेच महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘तलाव तेथे मासोळी’ अभियान संपूर्ण नागपूर विभागात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. सन 2022पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय अभियान स्वरुपात राबविण्याची गरज आहे. यासाठी मत्स्य व्यवसायाच्या धर्तीवर चारा उत्पादनास प्रोत्साहन, दुग्ध व्यवसाय, शेळी-मेंढी पालन, रेशीम तसेच हस्तकला उद्योग अशा शेतीपूरक व्यवसायावर आधारित अभियान राबविण्यास भर देण्यात येईल, असे विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी यावेळी सांगितले.
विभागीय आयुक्त अनूप कुमार म्हणाले की, “माझ्याकडे सध्या पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ कुलगुरुचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. विदर्भ विकास मंडळाच्या अध्यक्ष या नात्याने विदर्भातील गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसाय विकासाचा कृती आराखडा अहवाल यशस्वीपणे वेळेत तयार करण्याबाबत मी जातीने लक्ष घालणार आहे”.
बाल मजुरीमुक्त क्षेत्र घोषणेला साकार करण्यासाठी विदर्भातील शाळाबाह्य मुलांची यथास्थितीचा अभ्यास, शाळा नोंदीत नसलेल्या बालकांच्या स्थितीचा अभ्यास करुन कार्यरत उपाययोजनांना अधिक परिणामकारक करण्यासाठीच्या अभ्यास प्रस्तावावर यावेळी चर्चा करण्यात आली. हा अभ्यास अहवाल तयार करताना उपलब्ध असलेल्या शाळाबाह्य विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण याबाबत डॉ. किशोर मोघे यांनी सादर केलेल्या अहवालाला यावेळी मान्यता देण्यात आली.
‘स्टडी ऑन डेव्हलपींग ग्रोथ स्ट्रॅटेजी फॉर विदर्भ’ हा अभ्यास अहवाल तयार करण्याकरिता आवश्यक असलेल्या माहितीसाठी अकोला, वर्धा, बुलडाणा, यवतमाळ व वाशिम येथे गठीत करण्यात आलेल्या उप समितीद्वारे आयोजित करण्यात आलेल्या बैठकपार पडल्या आहेत. उर्वरित जिल्ह्यातील बैठकी लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती सदस्य सचिव तथा अपर आयुक्त श्रीमती डॉ. निरुपमा डांगे यांनी यावेळी दिली.
मानव विकास केंद्र, यशदा, पुणे यांच्या वतीने यवतमाळ जिल्ह्याचा विकास अहवाल तयार करण्यात येत आले. सप्टेंबर महिन्याअखेर हा अहवाल विदर्भ विकास मंडळाला प्राप्त होईल. यानंतर वाशिम जिल्ह्याचा विकास अहवाल तयार करण्यात येणार असल्याची माहिती तज्ज्ञ सदस्य डॉ. कपिल चांद्रायन यांनी यावेळी दिली.
बैठकीच्या सुरुवातीला श्रीमती डॉ. निरुपमा डांगे यांनी अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त अनूप कुमार यांच्याकडे पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु पदाचा कार्यभार सोपविण्यात आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करुन त्यांना पुस्तकरुपी भेट देवून गौरविले.