बंगळुरु: पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येबद्दल भाजप आमदार आणि माजी मंत्री डी.एन. जीवराज यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, ‘जर गौरी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) लोकांच्या मृत्यूवर होणाऱ्या जल्लोषावर लिहिले नसते तर कदाचित त्या जिवंत असत्या.’ कन्नड पत्रकार गौरी लंकेश यांची मंगळवारी अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली. गौरी यांच्या राहात्या घरी त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या हत्येवरुन डावे आणि काँग्रेस नेते भाजप व RSS वर आरोपांच्या फैरी झाडत आहेत.
जीवराज चिकमंगलुरु येथे भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. ते म्हणाले, ‘काही दिवसांपूर्वी गौरी लंकेश यांनी डेथ ऑफ द आरएसएस शिर्षकाखाली लेख लिहिला होता. या लेखात गौरींनी संघ स्वयंसेवकांबद्दल चुकीचा शब्दप्रयोग केला होता. त्यांच्या मृत्यूमागे हे देखिल कारण असू शकते. त्या ज्यापद्धतीचे लिखान करत होत्या ते सहनशिलतेपलिकडेचे होते.’
– काँग्रेस सरकारच्या काळात 11 संघ स्वयंसेवकांना मारण्यात आले. मात्र मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी आरोपींवर कोणतीही कारवाई केली नाही. गौरी या सर्व विषयांवर लिहित होत्या. मी त्यांना बहिणीसमान मानतो, मात्र त्यांनी संघाबद्दल चुकीचे लिहिले होते.
– जीवराज यांच्या या वक्तव्यानंतर वाद सुरु झाला आहे. काहींनी त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे.