मुंबई: अमरावती जिल्ह्यातील अचलपूरचे अपक्ष आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू हे महाराष्ट्रात आपल्या अनोख्या आंदोलनासाठी प्रसिद्ध आहेत. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारा हा आमदार आता आपल्या मतदारसंघाशिवाय राज्यभर विविध प्रश्नांसाठी आवाज अठवत आहे. सध्या शेतक-यांची कर्जमाफी व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात यासाठी राज्यातील फडणवीस सरकारच्या विरोधात बच्चू कडू यांनी रणशिंग फुंकले आहे. येत्या 1 ऑक्टोबर रोजी पंढरपूर येथे खासदार राजू शेट्टींसह त्यांनी शेतकरी ऊस परिषद आयोजित केली आहे.
आमदार बच्चू कडू हे पूर्वी फक्त आपल्याच मतदारसंघात व भागापुरते काम करायचे होते. मात्र, आता बच्चू कडू संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय होत आहे. याचे कारण जनसामान्यांच्या प्रश्नांविषयी त्यांची असलेली तळमळ. अचलपूर व अमरावती भागापुरते काम केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की राज्यातील इतर भागातही गरीब, सामान्यांची हीच अवस्था आहे. मग त्यांनी आपल्या कक्षा रूंदावत काम करायचे ठरवले. गरिबीला कोणतीही जात, धर्म नसतो व तो माझ्या भागातील असो की इतर भागातील. त्यामुळे बच्चू कडू यांनी संपूर्ण राज्यातील गरिबांसाठी आता काम करायचे ठरवलेले आहे. त्यामुळे ते आता आपल्या मतदारसंघात कमी व उर्वरित महाराष्ट्रात जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी फिरत असतात, समस्या जाणून घेत असतात.