लातूर: ‘ब्रेनडेड’ तरुणाचे अवयव दान करण्याचा त्याच्या कुटुंबियांनी संकल्प केल्यानंतर शहरात आज (मंगळवारी) ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला आहे. शासकीय मेडिकल कॉलेज ते लातूर विमानतळ असा 17 किलोमीटरचा हा ग्रीन कॉरिडॉर असेल. त्यामुळे शहर काही काळासाठी स्तब्ध होणार आहे.
लातूरला एक विमान दाखल झाले आहे. दिल्लीहून आणखी एक विमान येणार असल्याची माहिती मिळाली आहे. या संपूर्ण प्रक्रियेला चार वाजतील, असे सूत्रांनी माहिती दिली आहे.
किरणला घोषित केले ब्रेनडेड
मळवटीरोड भागात राहणार्या मुळच्या अंधोरी (ता.अहमदपूर) येथील किरण लोभे या तरूणाच्या घरावरील पत्र्यात वीजप्रवाह उतरला होता. त्याचा धक्का लागून किरण दूर फेकला गेला. त्याच्या डोक्याला जबर मार लागला. दहा दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. त्याला कवठाळे रुग्णालयातून रविवारी सरकारी दवाखान्यात हलवण्यात आले होते. त्याला डॉक्टरांनी ‘ब्रेनडेड’ झाल्याचे घोषित केले.
किरणचा मेंदू काम करीत नसला तरी बाकीचे अवयव शाबूत असल्याने त्याच्या नातलगांना अवयवदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. आई आणि नातेवाईक किरणचे अवयव दान करण्यास तयार झाले. किरणला वडील नाहीत. किरणच्या अवयवदानाची माहिती मुंबईला कळवण्यात आली. आता काही वेळातच हे डॉक्टर्स विमानाने लातुरात पोहोचतील. थेट सरकारी दवाखान्यात जाऊन शस्त्रक्रिया करुन तीन अवयव तातडीने नेले जातील. तेथे गरजूंवर प्रत्यारोपण केले जाईल. सरकारी दवाखान्यातून अवयव विमानतळाकडे नेताना लातुरचा मुख्य रस्ता पूर्णपणे रिकामा ठेवण्यात येईल. तशी तयारी पोलिसांनी केली आहे, प्रशासन सज्ज आहे. लातुरच्या इतिहासातली ही पहिलीच वेळ आहे.