बारामती: बारामाही अठरा काळ दारूच्या नशेत राहणार्या एका बापाने आपल्या चिमुकलीचा कटरने गळा चिरून हत्या केल्याची ह्रदयद्रावक घटना पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी गावात आज (बुधवारी) घडली. समीक्षा चारूदत्त शिंदे असे हत्या झालेल्या मुलीचे नाव आहे.
दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आपल्या पोटच्या सहा वर्षाच्या मुलीला क्रुरकर्मा पिता चारूदत्त शिंदे याने खाऊच्या आमिषाने घराबाहेर नेले. पोटच्या मुलीच्या जीवावर उठेल अशी पुसटशी कल्पना ही कोणाच्या मनाला शिवली नाही. मुलगीही बापच्या पाठोपाठ खाऊ मिळेल या आशेने चालु लागली. बापाने खाऊ दिला नाही. मात्र, जवळ दोनशे मीटरवर मक्याच्या शेतात नेऊन धारदार शस्त्राने गळा चिरुन पोटच्या पोरीचा जीव घेतला. खूनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. चिमुरडी शेजार्यांकडे जेवण करण्यासाठी गेली होती. ती घरी परतल्यानंतर आरोपीने हे पाऊल उचलल्याची चर्चा सुरु आहे.
निर्दयी बापाला फुटला नाही मायेचा पाझर
गळ्यावर शस्त्र फिरल्यावर मुलगी जीवाच्या आकांताने ओरडली. मात्र निर्दयी बापाला वर मायेचा पाझर फुटला नाही. मुलीच्या ओरडण्याचा आवजामुळे शेतात काम करणारे तुकाराम भोंग व मनिषा भोंग मदतीसाठी धावून आले. मात्र उशीर झाला होता. समीक्षा रक्ताच्या थोरोळ्यात निचपित पडलेली भोंग दापत्यांना दिसली. या दोघांवर ही चारुदत्तने काठीने हल्ला केला. अचानक हल्ला झाल्याने भोंग कुटुंबियांनी आरडाओरडा केल्याने देवीच्या मंदिराजवळ तरूण मंडळी मदतीसाठी धावू आले. दरम्यान खूनी पिता चारूदत्त पळून जाऊ नये म्हणून जमावाने खूनी पित्याला चोप देत पोलिस येईपर्यंत दोरखंडाने बांधून ठेवले. याप्रकरणी खूनी पित्याविरोधात पोलिसात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
चारूदत्त रामचंद्र शिंदे हा सतत दारूच्या नशेत राहत असल्याने पिंपळी (ता.बारामती) येथील त्याच्या आई-वडिलांनी ही त्याला घरातून हाकलले होते. म्हणून तो निमगाव केतकी (ता.इंदापूर) येथे सासुरवाडीत पत्नी लता शिंदे व तीन अपत्यासह राहत होता.