मुंबई/औरंगाबाद: राज्यभरातील 16 जिल्ह्यात आज (शनिवार) ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे. अहमदनगर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत दुपारी 12 वाजेपर्यंत 33 टक्के मतदान झाले आहे. दीड लाख मतदारांनी मतदान केले आहे. पहिल्या टप्प्यात जवळपास 3 हजाराहून अधिक ग्रामपंचायतींसाठी हे मतदान होत आहे. नगरपालिकांप्रमाणेच पहिल्यांदाच सरपंचपदासाठी थेट निवडणूक होणार आहे. त्यामुळे चुरस वाढली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत 16 टक्के मतदान झाले आहे. मराठवाड्यातील 1854 ग्रामपंचायतींसाठी हे मतदान होत आहे.
दुसऱ्या टप्प्यातील मतदान 14 तारखेला होईल. तर मतमोजणी 16 तारखेला होणार आहे. फडणवीस सरकारला 3 वर्ष पूर्ण होत असताना साडेसात हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतून सध्या मतदारांच्या मनात नेमके काय चालू आहे, हे समोर येणार आहे. दरम्यान मतदान शांततेत पार पडावे यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसही सज्ज आहेत.