नागपूर: महानगरपालिका रुग्णालयातील स्वच्छतेबाबत जागतिक आरोग्य संस्थेद्वारे (डब्लूएचओ) मान्यता प्राप्त “एसओपी” (स्टॅन्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) नुसार मॉड्युल तयार करावे आणि त्याचे काटेकोरपणे पालन करावे. स्वच्छतेबाबत तडजोड सहन केली जाणार नसून काम करण्यास इच्छुक नसलेल्यांची माहिती द्या असे, खडेबोल मनपा आय़ुक्तांनी आरोग्य विभागाच्या अधिका-यांना सुनावले. मंगळवारी (ता. 10 ऑक्टोबर) मनपा आयुक्त अश्विन मुदगल यांनी गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयाची पाहणी केली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, नगरसेविका परिणिता फुके, रुतिका मसराम, नगरसेवक अमर बागडे, धरमपेठ झोनचे सहायक आय़ुक्त महेश मोरोणे, कार्यकारी अभियंता अनिरुद्ध चौगंजकर, आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी (दवाखाना) डॉ. अनिल चिव्हाणे, आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी यांची उपस्थिती होती.
इंदिरा गांधी रुग्णालयात नियमित स्वच्छता होत नाही. डॉक्टरांची नियुक्ती नसल्याने येथील रुग्णांना मेडीकल किंवा मेयोमध्ये पाठविण्यात येते. या रुग्णालयात मुलभूत सुविधाही उपलब्ध नसल्याचे नगरसेविका परिणिता फुके यांनी आय़ुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. यावर आय़ुक्तांनी अधिका-यांना जाब विचारला असता, रुग्णालयाच्या देखभाल दुरुस्ती प्रस्ताव मंजुरीसाठी प्रलंबित असल्याने काम शक्य झाले नसल्याचे सांगितले. यावर आय़ुक्तांनी अधिका-यांना आवश्यक नियमांची पूर्तता करुन दिवाळीपूर्वी मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश दिले. नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आवश्यक पावले उचला, अडचण असल्यास मला माहिती द्या आणि प्रलंबित कामे पूर्ण करा असे निर्देशही आय़ुक्तांनी दिले. यावेळी आयुक्तांनी रुग्णालयातील विविध विभागांना भेट देऊन कर्मचा-यांच्याही समस्या जाणून घेतल्या तसेच आवश्यक सोयी-सुविधा लवकरच पुरविण्यात येतील असे आश्वासन दिले.