नागपूर: विभागीय, राज्यस्तरीय व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारांत नैपुण्य मिळविणाऱ्या नागपूर महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांचा सत्कार महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते शुक्रवार (ता.१३) ला मनपा मुख्यालयातील महापौर कार्यालयात करण्यात आला.
याप्रसंगी शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, बसपा गट नेता मोहम्मद जमाल, नगरसेविका लक्ष्मी यादव, नगरसेवक नरेंद्र (बाल्या) बोरकर, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, सहायक शिक्षणाधिकारी कुसुम चाफलेकर, क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते.
लाल बहादूर शास्त्री माध्यामिक शाळेच्या सुजीत यादव याने नागपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत (आंतर १७ वयोगट) सुवर्णपदक प्राप्त करीत जयपूर येथे झालेल्या राष्ट्रीयस्तरावरील स्पर्धेत त्याची निवड झाली होती. त्यात त्याने नैपुण्य प्राप्त केले. मनपाच्या मौलाना आझाद माध्यामिक शाळेचा अफाझ खान याने राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत (आंतर १४ वयोगट) नैपुण्य प्राप्त केले. नांदेड येथे झालेल्या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत (आंतर १७ वयोगट) मोहम्मद तोहसीब याने प्रावीण्य मिळविले. विभागीय स्पर्धा चंद्रपूर येथे झालेल्या हॉकी स्पर्धेत शाहनवाज खान याने नैपुण्य प्राप्त केले.
विवेकानंद हिंदी माध्यामिक शाळेच्या दिलीप कावरे याने राज्यस्तरीय जुडो स्पर्धेत (आंतर १७ वयोगट) नैपुण्य मिळवित नागपूर येथे झालेल्या विभागीय स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केले. तर वाल्मिकी नगर हिंदी माध्यामिक शाळेच्या रजनी रावल, प्रिया गुप्ता, रवि मिश्रा, रंजना ठाकूर यांनी विविध स्पर्धेत नैपुण्य प्राप्त केले.
या सर्वांचा सत्कार महापौर नंदा जिचकार यांनी केला. महानगरपालिका शाळांचे नाव उंचावल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्याधापिका नियत परवीन, संध्या इंगळे, मुख्याधापक संजय पुंड, शारीरिक शिक्षक नरेश सवाईथूल, शारीरिक शिक्षिका संध्या भगत, रजनी परिहार उपस्थित होते.