नागपूर: उकळता प्रवास करीत असलेल्या संतप्त प्रवाशांनी नागपूर रेल्वे स्थानकावर गोंधळ घातला. एसी बंद असलेला कोच बदलून देण्याची त्यांची मागणी होती मात्र, कोच उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांची समजुत घालून दुपारी १२.०५ वाजता गाडी रवाना करण्यात आली. यावेळी रेल्वे अधिकारी आणि आरपीएफ जवान बंदोबस्तास होते. हा प्रकार आज सकाळी १०.२५ वाजता नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट एकवर घडला.
बेंगळूरू – पाटलीपूत्र संघमित्रा एक्स्प्रेस नागपूर रेल्वे स्थानकावर सकाळी १०.२५ वाजता पोहोचली. बेंगळुरू पासूनच थर्ड एसीचा बी-२ कोच नादुरूस्त असल्याने एसी पूर्णपणे काम करीत नव्हता. त्यामुळे प्रवाशांना उकळता प्रवास करावा लागला. ज्या ज्या स्थानकावर गाडी थांबली त्या त्या ठिकाणी प्रवाशांनी एसी दुरूस्त करण्याची मागणी केली मात्र, पुढल्या स्थानकावर करु असे म्हणत रेल्वेने प्रवाशांची बोळवन केली. आज सकाळी नागपूर स्थानकावर गाडी येताच प्रवाशांनी एकच गोंधळ घातला. माहिती मिळताच एडीआरएम, वरिष्ठ विद्युत अभियंता, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, वरिष्ठ सुरक्षा आयुक्त यांच्यासह आरपीएफ जवान तैनात होते.
यावेळी प्रवाशांनी कोच बदलण्याची मागणी केली मात्र, रेल्वेकडे कोच उपलब्ध नसल्यामुळे तसे करणे शक्य नव्हते. मात्र, प्रवासी आपल्या मागणीवर अडून बसल्याने त्यांनी गाडी पुढे जावू दिली नाही. अखेर प्रवाशांची समजुत घालण्यात अधिकाºयांना यश आले. प्रवाशांना रिफंड देण्याची रेल्वे प्रशासनाने तयारी दाखविल्यामुळे १२.०५ वाजताच्या सुमारास गाडी पुढील प्रवासाला निघाली. तत्पूर्वी बी-२ बोगीत तीन टीसींना पाठविले. ते प्रवाशांना एसी नादुरूस्त असल्याचे प्रमाणपत्र देतील. त्या प्रमाणपत्रावरुन प्रवाशांना रिफंड मिळेल.