नागपूर: संयुक्त राष्ट्राअंतर्गत कार्यरत जागतिक बौद्धिक संपदा संस्था (डब्लू.आय.पी.ओ. अकादमी), केंद्र शासनाच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत राजीव गांधी राष्ट्रीय बौद्धिक संपदा व्यवस्थापन संस्था , नागपूर (राजीव गांधी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंटलेक्चुअल प्रॉपर्टी मॅनेजमेंट –आर.जी.एन.आय.आय.पी.एम.), महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूर (एम.एन.एल.यू.) यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक सिव्हिल लाईन्स स्थित आर.जी.एन.आय.आय.पी.एम. येथे ६ ते १७ नोव्हेंबर २०१७ दरम्यान बौद्धिक संपदेविषयी ग्रीष्मकालीन अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभ्यासवर्गाचे उद्घाटन 6 नोव्हेंबर रोजी नागपूरचे विभागीय आयुक्त अनुप कुमार यांच्या हस्ते करण्यात आले.
पेटंट्स, डिझाईन व ट्रेडमार्कचे महानियंत्रक एस. ओ.पी.गुप्ता, डब्ल्यू.आई.पी.ओ. अकादमीच्या शैक्षणिक कार्यक्रमाचे संस्था-प्रमुख जोसेफ एम. ब्रॅडली, महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विजेंदर कुमार, आणि पेटंट व डिझाईन्सचे संयुक्त नियंत्रक डॉ.के.एस. कर्डाम याप्रसंगी उपस्थित होते. बांगलादेश, कोरिया, भारत, दक्षिण आफ्रिका, दुबई यासह अनेक देशांतील सुमारे ४८ प्रतिनिधी या अभ्यासवर्गात सहभागी झाले आहेत. या अभ्यासवर्गाच्या माध्यमातून संशोधक विद्यार्थी आणि तरुण व्यावसायिकांना बौद्धिक संपदा (आय.पी.) क्षेत्रातील सविस्तर ज्ञान घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
नागपूरचे संभाव्य भौगोलिक संकेतांचे केंद्र म्हणून महत्व अधोरेखीत करतांना अनूप कुमार यांनी बौद्धिक संपत्तीचे विशेषत: भौगोलिक संकेतांक यांचे संरक्षण, बौद्धिक संपदा हक्कांची सुलभ नोंदणी-प्रकीया व त्यांची कार्यक्षम अंमलबजावणी यावर भर दिला.
ओ.पी.गुप्ता यांनी आपल्या मुख्य भाषणात राष्ट्रीय बौद्धिक संपदा हक्क (आय.पी.आर.) धोरण 2016 च्या उद्दिष्टांविषयी सांगितले. या ग्रीष्मकालीन अभ्यासवर्गामध्ये सहभागी होण्याने प्रशिक्षणार्थ्यांचे कौशल्य सुधारेल आणि बौद्धिक संपत्तीच्या विविध पैलूंवर त्यांना लक्ष केंद्रित करता येईल, असे ते यावेळी म्हणाले. डॉ. विजेंदर कुमार यांनी विशेषतः आय.पी. ज्ञान आणि परंपरागत ज्ञानाच्या शिक्षणाचा प्रचार व प्रसार याचे महत्व उपस्थितांसमोर मांडले, आय.पी. व्यवस्थापना विषयी जाणून घेण्याची एक उत्तम संधी या अभ्यासवर्गाच्या माध्यमातून मिळतेच, सोबत आय.पी. क्षेत्रात कार्यरत जगभरातील लोकांशी संवाद साधण्याचे व्यासपीठही सहभागींना उपलब्ध होते, असे विचार जोसेफ एम. ब्रॅडली यांनी यावेळी व्यक्त केले. अशाच प्रकारचे अभ्यासवर्ग संबंधित आयोजकांतर्फे नियमितपणे आयोजित केले जातील, असेही त्यांनी सांगितले,
महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूरचे प्रा. डॉ. नरेश कुमार वत्स यांनी यावेळी आभार प्रदर्शन केले.आर.जी.एन.आय.आय.पी.एम, नागपूरचे प्रमुख व, सहाय्यक नियंत्रक पेटंट्स आणि डिझाइन्स पंकज बोरकर, आर.जी.एन.आय.आय.पी.एम. च्या वरिष्ठ दस्ताऐवज अधिकारी (सिनीयर डॉक्युमेंटेशन ऑफिसर) सी.डी. सातपुते, वरिष्ठ संयुक्त नियंत्रक पेटंट्स आणि डिझाईन्स, पेटंट ऑफिस नवी दिल्लीचे डॉ. के.एस. कदम, सुखदीप सिंग, डॉ. मनीष यादव, डॉ. रागीनी खुबळकर हे सदर अभ्यासवर्ग कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रयत्न करीत आहेत.