विदर्भाचा मुद्दा हा केवळ निवडणुकीपुरता असतो, त्या आटोपल्या की मुद्दाही हरवतो, याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीपूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी हमीपत्र लिहून देणारे भाजप नेते व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या वक्तव्यामुळे आला आहे. विदर्भ सक्षम झाल्याशिवाय स्वतंत्र राज्य करणे योग्य होणार नाही, असे प्रतिपादन त्यांनी आज येथे केले.
‘अॅग्रोव्हिजन-२०१७’ या त्यांच्या पुढाकाराने आयोजित कृषी प्रदर्शनात दूध उत्पादन परिषदेत ते बोलत होते. माजी खासदार आणि विदर्भ राज्य परिषदेचे अध्यक्ष दत्ता मेघे यांनी उपस्थितीत केलेल्या स्वतंत्र विदर्भ राज्याच्या उल्लेखावर गडकरी यांनी तूर्त विदर्भ राज्याचा प्रस्ताव आणण्याचा मुद्दा फेटाळला. विदर्भ आर्थिकदृष्टय़ा सक्षम झाल्याशिवाय स्वतंत्र राज्य करणे योग्य होणार नाही, असे ते म्हणाले. विदर्भात अनेक प्रकल्प सुरू झाले आहेत. त्यातून विदर्भ सक्षम होईल,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. स्वतंत्र विदर्भाची मागणी वेळोवेळी गडकरी यांच्यासह सर्वच प्रमुख नेत्यांनी यापूर्वी केली आहे, त्यासाठी आंदोलनेही केली आहे.
विशेष म्हणजे, लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी विदर्भवादी संघटनांना त्यांनी सत्तेत आल्यास विदर्भ देऊ, असे लेखी आश्वासन दिले होते. या संघटना अजूनही गडकरी यांना या आश्वासनाची आठवण करून देत आहेत. केंद्रात आणि राज्यात सत्तेत येऊनही भाजपने त्यांचे आश्वासन पाळले नाही. आता सक्षमतेचा मुद्दा उपस्थित करून त्यापासून पळ काढण्याचा प्रयत्न भाजप करीत असल्याचे गडकरींच्या वक्तव्यातून स्पष्ट होते.
राजकीय इच्छाशक्ती नाही
विदर्भ सक्षम झाल्याशिवाय राज्य होणार नाही हे म्हणने वस्तूस्थिती नाकारण्यासारखे आहे, आम्ही स्वतंत्र विदर्भाचा दोन वेळा अर्थसंकल्प सादर केला. २०३-१४ मध्ये मांडलेल्या अर्थसंकल्पानुसार विदर्भाचे उत्पन्न ४१,५१० कोटी आणि खर्च ४१,४०० कोटी होता, २०१७-१८ चा अर्थसंकल्प आम्ही मांडला त्यात उत्पन्न ५४,०४० कोटी व खर्च ५२,३८० कोटी रुपये होता. वीज खर्च कमी केला आणि कुठल्याही नव्या कराचा यात समावेश नव्हता. विशेष म्हणजे यावर कोणी आक्षेप घेतला नाही. ही वस्तूस्थिती नाकारून आता सक्षमतेचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. भाजप नेत्यांमध्ये राजकीय इच्छाशक्ती नाही, मोदींपुढे स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा ठामपणे मांडण्याची हिंमत्त नाही. त्यामुळे वेगवेगळी कारणे दिली जात आहे. – वामनराव चटप, माजी आमदार व नेते विदर्भ जनआंदोलन समिती.