Published On : Sat, Nov 25th, 2017

नेताजी मार्केटमधील समस्या तातडीने दूर करा

Advertisement


नागपूर: नेताजी मार्केट येथील फूल व्यावसायिकांना ज्या-ज्या अडचणी आहेत, त्या तातडीने दूर करा. परिसरातील दुर्गंधीवर उपाय शोधा. कचऱ्याची विल्हेवाट नियमितपणे लावा, असे निर्देश नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त अश्विन मुदगल यांनी दिले.

नेताजी मार्केट येथे शनिवारी (ता. २५) केलेल्या पाहणी दौऱ्यात त्यांनी सदर आदेश दिले. नेताजी मार्केट फूल व्यापारी असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच आयुक्त अश्विन मुदगल यांची भेट घेऊन फूल मार्केटमध्ये काही आवश्यक सोयी-सुविधा देण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी शनिवारी फूल मार्केटचा प्रत्यक्ष दौरा करून तेथील समस्या जाणून घेतल्या.

व्यापाऱ्यांनी फूल मार्केटमध्ये घाणीचे साम्राज्य असल्याचे सांगितले. एक किलोमीटर परिसरातील कचरा संकलन केंद्र या मार्केटमध्ये असल्याने गार्यीचा संचार आहे. त्या गार्यींचाही फूल व्यापाऱ्यांना त्रास होतो. कचरा संकलन केंद्राच्या ठिकाणी भिंत तुटली असल्याने तो इतरत्र पसरतो. पाण्याची व्यवस्था नसल्याचेही व्यापाऱ्यांनी सांगितले.

Gold Rate
Wednesday 15 Jan. 2025
Gold 24 KT 78,400 /-
Gold 22 KT 72,900/-
Silver / Kg 89,700 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावर आयुक्तांनी कचऱ्याची विल्हेवाट रोज लावण्याचे निर्देश दिले. कचरा इतरत्र पसरू नये म्हणून कंटेनरची व्यवस्था करा. मात्र कंटेनर मध्ये कचरा टाकण्याची जबाबदारी व्यापाऱ्यांनी उचलावी, असे आवाहन त्यांनी केले. पाण्याची व्यवस्थाही करण्यात येईल. मात्र, असोशिएशनने त्याचे बिल भरण्याची आणि देखभालीची व्यवस्था करावी, असेही ते म्हणाले. कचऱ्याचे डम्पिंग इतरत्र करता येईल का, याबाबतही आयुक्त मुदगल यांनी चाचपणी केली. फूल बाजारात मुतारीची व्यवस्था करण्यात येईल आणि वीज सब मीटर साठी मनपा तर्फे ना-हरकत देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, सहायक आयुक्त (कर) मिलिंद मेश्राम, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे, नेताजी मार्केट फूल व्यापारी असोशिएशनचे रामचंद्र पिलारे, दिनेश तितरमारे, नरेंद्र मिरे,भोला दातारकर, मनमीत पिलारे उपस्थित होते.

Advertisement