मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला आज सकाळी नाशिकमध्ये इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. हेलिकॉप्टरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वजन असल्याने ते उतरवावे लागल्याचे समजते. हॅलिकॉप्टरमधील वजन कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे सचिव बाहेर पडल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये हेलिकॉप्टरने पुन्हा उड्डाण केले. मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री सतत दौऱ्यावर असल्याने त्यांच्याबरोबर अधिकाऱ्यांचा फौजफाटाच आहे. मुख्यमंत्र्यांच्या हॅलिकॉप्टरने अशाप्रकारे इमर्जन्सी लँडिंग करण्याची ही या वर्षातली सलग दुसरी घटना असून याच वर्षी मे महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या हॅलकॉप्टरला झालेल्या अपघातातून ते थोडक्यात बचावले होते. सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हॅलिकॉप्टरसंदर्भात असा तिसरा प्रसंग ओढावल्याने त्यांच्या सुरक्षेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
आज सकाळी दहाच्या सुमारास मुख्यमंत्री नाशिकहून औरंगाबादला जात असताना ही घटना घडली. हेलिकॉप्टरनं उड्डाण केल्यानंतर काही वेळातच पायलेटने त्याची इमर्जन्सी लँडिंग केले. यावेळी हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि इतर काही सचिवही होते. मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री सतत दौऱ्यावर असल्यामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बरंच सामन असल्याचे समजते. त्यामुळे आधीच सामानचे वजन त्यात अनेकजण हेलिकॉप्टरमध्ये बसल्याने वजन वाढले आणि पायलटनं हेलिकॉप्टर तात्काळ हेलिपॅडवर उतरवले. हेलिकॉप्टरमधून एका सचिवाला खाली उतरल्यानंतरच हेलिकॉप्टर औरंगाबदच्या दिशेनं रवाना झाले.
आठ महिन्यातील तिसरी घटना
आज नाशिकमध्ये मुख्यमंत्र्याच्या हेलिकॉप्टरमध्ये घडलेला हा. गेल्या आठ महिन्यांच्या काळातील तिसरी घटना आहे. मे आणि जुलैमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला दोन वेळा अपघात झाला आहे. २५ मे रोजी लातूर दौऱ्यावर असताना निलंगा येथून उड्डाण घेत असताना मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरच्या पात्यांचा वीजेच्या तारांना स्पर्श झाल्याने ते कोसळले. यावेळी मुख्यमंत्र्यांसह सरकारी अधिकारी हेलिकॉप्टरमध्ये होते.
या अपघातातून ते थोडक्यात बचावले होते. या अपघाताच्या काही दिवसांनतरच म्हणजे ७ जुलै रोजी मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमध्ये बसताना गडबड झाल्याने हेलिकॉप्टर उतरवण्यात आले होते. अलिबाग येथील आमदार जयंत पाटील यांचा वाढदिवस आणि पिएनपी नाट्यगृहाच्या उद्घाटन सोहळ्यानंतर मुख्यमंत्री मुंबईला परत जात असताना ही घटना घडली होती. मुख्यमंत्री बसण्यापुर्वीच हेलिकॉप्टरने टेक ऑफ घेण्यास सुरुवात केली. सदर बाब मुख्यमंत्री फडणवीस आणि त्यांच्या सुरक्षारक्षकांच्या लक्षात आली आणि ते हेलिकॉप्टरपासून तातडीने दुर गेले.
त्यामुळे पुढील अनर्थ ठळला. यानंतर अचानक उडालेल्या हेलिकॉप्टरला वैमानिकाने पुन्हा खाली उतरवले. यानंतर हेलिकॉप्टरची सुरक्षा तपासणी करण्यात आली. याच हेलिकॉप्टर मध्ये बसून मुख्यमंत्री मुंबईच्या दिशेने रवाना झाले.