नागपूर: बोंडअळी आणि कर्जमाफी यामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकार एकरी २५ हजार रुपये मदत देईल असे वाटले होते परंतु सरकारने आज दिलेल्या उत्तराने हे सरकार शेतकऱ्यांना काहीच देवू शकणार नाही. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकार करीत असल्याचा आरोप विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केला.
बुधवारी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी नियम २९३ अन्वये बोंडअळी आणि कर्जमाफीबाबत चर्चा घडवून आणली. या चर्चेवर आज मुख्यमंत्र्यांनी तसेच अन्य मंत्र्यांनी उत्तर दिले. मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे उत्तर समाधानकारक नव्हते. सरकारने दिलेले उत्तर पहाता बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळेल की नाही याबाबत आत्ता शंकाच निर्माण झाल्याचे अजित पवार म्हणाले.
या अधिवेशनामध्ये सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्याची फक्त घोषणाच केली आहे. मागच्या सरकारने काय केले हेच गेली तीन वर्ष हे सरकार सांगत आहे पण तीन वर्षात यांनी काय केले हे सांगण्याचे धाडस यांच्यामध्ये नाही अशी टिका अजित पवार यांनी केली.
मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये आज जे काही सांगितले त्यातली एकही गोष्ट खरी होणार नाही याची खात्री असून सरकार फक्त दिशाभूल करण्याचे काम करत आहे सरकारच्या उत्तराने शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे असेही अजित पवार म्हणाले.