नागपूर: ओबीसींना वेगवेगळी आमिषे दाखवण्याचा प्रयत्न सरकारकडून होतो आहे. मराठा समाजाच्याबाबतीतही सरकारने तेच केले आहे. मुस्लिम समाजाच्या आरक्षणाची वासलात लावण्याचे काम या सरकारने केले आहे आणि धनगर समाजाला आरक्षण देणार अशी घोषणा करणारे हे सरकार इंचभरही पुढे सरकताना दिसत नाही. मूळ आरक्षणाचा फेरविचार करण्याची भूमिका ज्यावेळी घेतली जाते त्यावेळी दिक्षाभूमीपासून तुम्ही हे अभियान सुरु कराल त्यावेळी दिक्षाभूमीला वंदन करुन मूळ आरक्षणाचा फेरविचार करणारी मागणी करणाऱ्या या जातीवादी सरकारची विचारधारा किती समाजामध्ये मोठयाप्रमाणात विघटन करण्याच्या प्रक्रियेवर काम करते आहे याचाही प्रचार आणि प्रसार या अभियानाच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रात करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केले.
ऊठ ओबीसी जागा हो नव्या क्रांतीचा धागा हो म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलच्यावतीने आजपासून राज्यस्तरीय जनजागृती अभियानाला सुरुवात झाली. या अभियानाला हिरवा झेंडा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दाखवला.
या अभियानाच्या शुभारंभप्रसंगी विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी ओबीसी सेलच्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी आपल्या भाषणामध्ये सरकारवर पुन्हा हल्लाबोल केला. मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये वाढलेल्या गुन्हेगारीवर त्यांनी भाष्य केले. नागपूर ही राज्याची उपराजधानी आहे. इथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असताना मुख्यमंत्री धांदात खोटे बोलून पोलिसांचे अभिनंदन करत आहेत. भरदिवसा इथे हत्या होत आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. राज्यात क्राईमच्या यादीत नागपूरचे नाव अग्रक्रमावर आहे. नागपूरचे नाव बदनाम होत असताना सरकार मात्र निव्वळ बघ्याची भूमिका बजावत असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला.
आपण शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांनी पुढे जात आहोत. यवतमाळ ते नागपूर अशी पदयात्रा काढून आपण एक वेगळा संदेश समाजापर्यंत पोचवला आहे तसाच संदेश ओबीसींच्या या राज्यस्तरीय जनजागृती अभियानातून राज्याला मिळाला पाहिजे आणि यातून सरकारची पोलखोलही होणार आहे असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला. या जनजागृती अभियानाला कशापध्दतीचा मार्ग असावा आणि यातून कसा संदेश गेला पाहिजे याच्या सूचनाही अजित पवार यांनी यावेळी दिल्या.
या अभियान शुभारंभाला विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे , माजीमंत्री अनिल देशमुख, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, आमदार जयदेव गायकवाड, आमदार प्रकाश गजभिये, माजी आमदार रमेश बंग आदींसह ओबीसी सेलचे पदाधिकारी,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
हे जनजागृती अभियान आजपासून दिक्षाभूमी ते कोल्हापूर-पुणे मार्गे बारामतीमध्ये १४ एप्रिलला पोचणार आहे.