नवी दिल्ली- संपूर्ण देशाला हादरवून टाकणा-या 2 जी स्पेक्ट्रम घोटाळा खटल्याचा आज निकाल लागला आहे. ए. राजा व कनिमोळीसह सर्व आरोपींना दोषमुक्त करण्यात आले आहे. पतियाळा हाऊस कोर्टाच्या सीबीआय विशेष न्यायालयानं माजी दूरसंचार मंत्री ए. राजा आणि खासदार कनिमोळी यांच्यासहीत 25 आरोपींना दोषमुक्त केले आहे.
सीबीआयच्या विशेष न्यायायालयात या घोटीळ्यासंबंधी खटल्यांचे कामकाज सुरू आहे. यातील एक खटला सीबीआयने व एक खटला अंमलबजावणी संचालनालयाने नोंदवला आहे. निकाल वाचून दाखवण्याच्या दिवशी या न्यायालयाने कनिमोळी आणि ए. राजा यांच्यासह इतर आरोपींना न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. संपुआ सरकारच्या काळात झालेल्या या स्पेक्ट्रम वाटप घोटाळ्यात देशाच्या तिजोरीचे १ लाख ७६ हजार कोटीचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले होते. तत्कालीन विरोधी पक्ष भाजपाने यामुळे सरकारविरोधात केवळ संसदेतच नव्हे तर सर्व देशात सरकारविरोधात आंदोलने आणि विरोध प्रदर्शन केले होते. द्रमुक पक्षाचीही या महाघोटाळ्यामुळे मोठी नाचक्की झाली होती.
कनिमोळी आणि ए. राजासह निर्माता करिम मोलानी, उद्योजक शाहिद बलवा आणि अनेकांचे भवितव्य या निकालातून स्पष्ट होणार आहे. महालेखापरिक्षकांनी या घोटाळ्यात सरकारी तिजोरीचे १ लाख ७६ हजार कोटींचे नुकसान झाल्याचे तेव्हा स्पष्ट केले असले तरी सीबीआयने मात्र या घोटाळ्यात केवळ ३० हजार कोटींचे नुकसान झाल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबत बोलताना सीबीआयचे माजी संचालक ए. पी.सिंग म्हणाले, या घोटाळ्याचा तपास करताना आमच्यावर सर्व बाजूंनी आमच्यावर दबाव होता, तत्कालीन सरकारने या स्पेक्ट्रम वाटपात काहीच नुकसान झाले नाही ( झिरो लाँस) अशी भूमिका घेतली होती मात्र आमच्या गणनानुसार यात ३०, हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट केले. सीबीआयला पिंजर्यातला पोपट म्हणणे योग्य नाही कारण याच काळात आम्ही इतर राजकीय नेत्यांवरील खटले व तपास यशस्वीरित्या पूर्ण केला होता.