नागपूर: सोशल मिडीयावर लक्ष आणि गुन्हेगारांकडे दुर्लक्ष केल्यानंच भ्रष्टाचार व गुन्हेगारीत महाराष्ट्र देशात अव्वल झाला आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्था इतकी ढासळली आहे की महिलांना, सामान्य नागरिकांना भीती वाटत आहे. राज्यात आज आणिबाणीसदृश परिस्थिती असून परिस्थितीत सुधारणा न झाल्यास विरोधी पक्ष रस्त्यावर उतरुन सरकारशी संघर्ष करेल, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज सरकारला दिला.
राज्यातील ढासळती कायदा सुव्यवस्था व सरकारच्या अपयशासंदर्भात विधान परिषदेत दाखल अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत भाग घेताना श्री. मुंडे यांनी सरकारच्या अपयशाचे वाभाडे काढले. ते म्हणाले, सोशल मिडियावर सरकारविरोधात लिहिणाऱ्यांवर सरकारचे बारकाईनं लक्ष आहे. विरोधी लेखन करणाऱ्यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात टाकलं जातंय. पत्रकारांना पोलिस ठाण्यात बोलावून धमकावण्यात येत आहे. यासंदर्भात त्यांनी श्री. मंगेश चिवटे आणि श्री. विवेक भावसार यांची उदाहरणेही दिली. सोशल मिडीयावर वॉच ठेवण्यात दंग असल्यानं पोलिसांचं कायदा-सुव्यवस्थेकडे दुर्लक्ष झालं असून त्यामुळेच हत्या, खून, अपहरण, बलात्कारातल्या आरोपी मोकाट फिरत आहेत, असा आरोपही श्री. मुंडे यांनी केला.
राज्य भ्रष्टाचार व गुन्हेगारीमुक्त करण्याचं आश्वासन देऊन आपण सत्तेवर आलात, परंतु या दोन्ही क्षेत्रात महाराष्ट्र गेली तीन वर्षे सलगपणे अव्वल राहिला आहे. मुख्यमंत्र्यांचं शहर असलेल उपराजधानी नागपूर देशात सर्वाधिक गुन्हेगारीत देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. याबद्दल मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करावंच लागेल, असा उपरोधित टोला त्यांनी लगावला.
जमीन विकून आलेला पैसा, पावडरनं कमावलेलं शरीर आणि मोदी लाटेत आलेलं सरकार फार काळ टिकत नाही, असा इशारा देत श्री. मुंडे यांनी सरकारला आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याचं आवाहन केलं. मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरात डिस्को थेकच्या नावावर डान्स बार सुरु आहेत. तिथं कोट्यवधी रुपयांची उधळण होते. ठाणे ग्रामीणच्या पोलिस अधिक्षकांनी बंद केलेले ४३ बार अप्पर मुख्य सचिवांनी दोन दिवसात ज्या तत्परतेने पुन्हा सुरु करुन दिले, ती तत्परता संशयास्पद असल्याचा आरोपही श्री. मुंडे यांनी केला. डान्सबार बंदीसंदर्भात माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर. आर. पाटील यांनी दाखवलेला कणखरपणा आपणही दाखवावा, असं आव्हानही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं.
राज्यातील कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. नागपूर शहरात गुंडांचं राज्य आहे. शहरातला नामचीन गुंड मून्ना यादवला मुख्यमंत्री वैधानिक मंडळाचे पद कसं देऊ शकतात ? नागपूर पोलिसांना मुन्ना यादवसारखा गुंड सापडत नसेल तर, डॉ. दाभोळकर, कॉम्रेड पानसरे साहेबांच्या हत्येमागचे सूत्रधार ते कसा शोधू शकतील, असा असा सवालही त्यांनी विचारला.
राज्यातील महिला पोलिस अधिकारी दीड वर्षे संशयास्पदरित्या बेपत्ता होते. तिचा शोध घेण्यासाठी कुटुंबिय वरिष्ठांचे उंबरठे झिजवतात. वरिष्ठ पोलिस अधिकारी दाद देत नाहीत. शेवटी न्यायालयाकडून निर्देश आल्यानंतर पोलिसांना कारवाई करावी लागते. हे गंभीर आहे. राज्यातील महिला पोलिस अधिकारी बेपत्ता असताना गृहमंत्री सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांना झोप तरी कशी लागू शकते, असा प्रश्नही त्यांनी विचारला.
ऊसदरासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला जातो. त्या शेतकऱ्यांच्या पायावर बंदूकीच्या गोळ्या मारायला भाजपचे प्रदेशाध्यक्ष सांगतात. ज्या पोलिसांनी शेतकऱ्यांवर गोळीबार केला त्या पोलिसांवर कारवाई करण्याची हिंमत ‘पाच पिढ्यांचे’ मुख्यमंत्री दाखवणार का? असेही श्री. मुंडे यांनी विचारले. सांगलीतील अनिकेत कोथळे याच्या कोठडीतील मृत्यूचे प्रकरण मानवाधिकार आयोगाकडे का पाठवले नाही ? असेही त्यांनी विचारले. राज्यातील ढासळत्या कायदा-सुव्यवस्थेबद्दल गेली तीन वर्षे सत्तेत असलेले सरकारच जबाबदार असून या या अपयशाचे उत्तर सरकारला द्यावेच लागेल, असंही श्री. मुंडे यांनी स्पष्ट केले.