नागपूर: गोवा, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि अन्य काही राज्यामध्ये दुध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते त्याप्रमाणे राज्यात दुध उत्पादक शेतकऱ्यांना ५ रुपये प्रतिलिटर अनुदान द्यावे अशी मागणी विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केली. दुध उत्पादक शेतकऱ्यांना मिळत असलेल्या दराबाबत सभागृहामध्ये चर्चा झाली त्यावेळी प्रश्नोत्तराच्या तासामध्ये अजित पवार यांनी वरील मागणी केली.
पाण्याची बाटली २० रुपयाला मिळते मग दुधाला कमी भाव का ? शेतकऱ्यांच्या दुधाला जास्त दर देण्याची गरज असून याबाबत शासनाने लवकरात लवकर बैठक लावावी आणि नवीन वर्षाची सुरुवात दुध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दयावा असेही अजित पवार म्हणाले.
सरकार दुध उत्पादक शेतकऱ्यांना किंमत देत नाही, दुधाला दर देण्याबाबत सरकार फक्त तारीख पे तारीख देत आहे. सरकारने २७ रुपये दर जाहीर करुन देखील शेतकऱ्यांना २० ते २२ रुपये असा दर मिळत आहे. सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे राज्यातील दुध संघ बंद पडतील अशी भीती विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केली.