Published On : Wed, Jan 24th, 2018

संविधानाच्या रक्षणासाठी स्वातंत्र्य लढ्याप्रमाणे पुन्हा लढा द्यावा लागेलः खा. अशोक चव्हाण

Advertisement

जळगाव: काँग्रेस पक्षाने देशाला स्वातंत्र्यमिळवून देण्यासाठी इंग्रजांशी लढा दिला होता आता देशाचे संविधान वाचवण्यासाठी काँगेस कार्यकर्त्यांनी पुन्हा लढा देण्यासाठी सज्ज रहावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले. ते जळगाव येथे काँग्रेस पक्षाच्या जिल्हास्तरीय शिबीरात बोलत होते.

जळगावच्या गोदावरी अभियांत्रीकी विद्यालयाच्या प्रांगणात आज काँग्रेसचे दुसरे जिल्हास्तरीय शिबिर पार पडले. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना खा. चव्हाण म्हणाले की, भाजप सरकारचा गेल्या साडे तीन वर्षाचा काळ म्हणजे फक्त घोषणांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असा आहे. राज्यातले शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर येऊन आत्महत्या करू लागले आहेत. किड्या मुंग्या प्रमाणे माणसे मरत आहेत पण सरकारला काही देणेघेणे नाही अशी परिस्थिती आहे. राज्यातील आणि देशातील सरकारच्या नाकर्तेपणामुळे त्रस्त झालेली जनता आता निवडणुकीची वाट पाहत आहे. येणा-या निवडणुकीत देशातील आणि राज्यातील जनता भाजप सरकारला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेस कार्यकर्त्यांनी जनतेचा आवाज होऊन या सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष अधिक तीव्र करावा असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केले.

Gold Rate
Thursday 13 March 2025
Gold 24 KT 87,100 /-
Gold 22 KT 81,000 /-
Silver / Kg 99,100 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above


या शिबिरात बोलतना राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणावर सडकून टीका केली. मोदी आणि फडणवीसांच्या काळात देशाची आणि राज्याची सर्वच क्षेत्रात अधोगती झाली असून उद्योग धंद्यावर मंदीचे सावट असून बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महाराष्ट्राच्या शेती आणि उद्योग क्षेत्राला याचा मोठा फटका बसला असून राज्यात गुंतवणुकीचे करार केलेल्या अनेक कंपन्यांनी माघार घेऊन कर्नाटकसारख्या राज्यात गुंतवणूक केली आहे. मेक इन महाराष्ट्र सपशेल अपयशी ठरले आहे. नोटाबंदीसारखा अविचारी निर्णय घेऊन सरकारने देशातला सगळा काळा पैसा पांढरा केला असा आरोप करून नोटाबंदीच्या निर्णयाची संसदेच्या संयुक्त समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

माजी मंत्री प्रा. वसंत पुरके, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आ. भाई जगताप, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा अॅड. चारुलता टोकस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व सोशल मिडीया विभागाचे प्रमुख अभिजीत सपकाळ, स्मिता शहापूरकर यांनीही काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.


महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा अॅड. चारुलता टोकस आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम यांच्या अध्यक्षतेखाली महिला काँग्रेस आणि युवक काँग्रेसची जिल्हास्तरीय शिबिरे पार पडली.

या मेळाव्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम या पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी प्रांताध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या हस्ते काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष माजी खा. उल्हास पाटील, माजी आ. शिरीष चौधरी, काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, अनुसुचीत जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. राजू वाघमारे, प्रदेश सरचिटणीस रामकिशन ओझा, पृथ्वीराज साठे, विनायक देशमुख, ललिता पाटील, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, हेमलता पाटील, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव आबा दळवी, शाह आलम, जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संदीप पाटील, जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष डॉ. राधेशाम चौधरी यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Advertisement
Advertisement