नागपूर: नागपूर महानगरपालिकेद्वारे घरकुल योजनेअंतर्गत मौजा नारी येथे तयार करण्यात आलेल्या निवासी संकुलच्या लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या घराचा ताबा १५ फेब्रुवारीपर्यंत देण्याचे निर्देश स्थापत्य समितीचे सभापती संजय बंगाले यांनी दिले. एस.आर.ए. अंतर्गत बांधकाम झालेल्या निवासी संकुलाच्या पाहणीप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी त्यांच्यासमवेत माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, उपसभापती अभय गोटेकर, नगरसेवक पिंटू झलके, अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते, कार्यकारी अभियंता (स्लम) डी.डी.जांभूळकर, आर्किटेक वीरेंद्र खरे, राजू रहाटे, एसएनडीएलचे आल्हाद बिंदू, जयंत सांबरे प्रामुख्याने उपस्थित होते.
शासनाच्या गृहनिर्माण विभागाच्या निर्णयानुसार, नागपूर शहरातील गरिबांना मुलभूत पायाभूत सुविधा देण्यासाठी पीपीपी सहभागातून बीएसयूपी योजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शहरातील विविध आरक्षणाच्या जागांवर वसलेल्या ३३ झोपडपट्ट्यांमधील नागरिक या योजनेचे लाभार्थी म्हणून निवडण्यात आले आहेत. मौजा नारी येथे तयार करण्यात आलेल्या निवासी संकुलात ५४४ निवासी संकुल तयार करण्यात आलेले आहेत. ५४४ घरकुलांकरीता १६७ लाभर्थ्याची निवड करण्यात आली आहे. उर्वरित ३७७ लाभार्थी निवडण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता डी.डी. जांभूळकर यांनी दिली.
या संकुलामध्ये मल्टीपर्पज हॉल, शाळा, आरोग्य केंद्र, ११ दुकाने, खेळाचे मैदान, बगीचा आदी सुविधा देण्यात आलेल्या आहेत. केलेल्या कामांबद्दल माजी महापौर प्रवीण दटके यांनी कौतुक केले. १५ दिवसांच्या आत लाभार्थ्यांना ताबा देण्याचे निर्देश दिले. यावेळी लाभार्थ्यांनी मान्यवरांचे आभार मानले.