वाडी(अंबाझरी): राज्यात विविध नगर परिषद, नगरपंचायतीच्या मुदत संपलेल्या व काही रिक्त झालेल्या जागेकरिता निवडणूक कार्यक्रमाचा पहिला टप्पा म्हणून राज्य निवडणूक आयोगाने त्या त्या क्षेत्रात मतदार याद्या तयार करणे वेळापत्रक घोषित करण्याचे आदेश जारी केले आहे.त्या अनुषंगाने वाडी नगर परिषद क्षेत्रातील नगरसेवक श्याम मंडपे याचे नगरसेवक पद शासनाने रद्द ठरविल्याने या प्रभाग क्र 1 मध्ये पोटनिवडणुक घेण्याचे दृष्टीने मतदार यादी तयार करण्यात येईल.
राज्य निवडणूक आयोगाचे अप्पर सचिव रा, वा,फणसेकर यांच्या स्वाक्षरीने दि.3 फेब्रुवारीच्या या आदेशान्वये दि. 10 जानेवारी 2018 ची मतदार यादी ग्राह्य धरून दि.9 फेब्रुवारी ला प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. 16फेब्रुवारी पर्यंत या मतदार यादीवर नागरिकांना आक्षेप व सूचना नोंदविता येतील. 21 फेब्रुवारी ला प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. 26 फेब्रुवारीला मतदान केंद्राची यादी प्रसिद्ध करण्यात येईल, प्रभाग निहाय व मतदान केंद्र निहाय मतदार याद्या अधिप्रमाणित करून अंतिम यादी 3 मार्च ला प्रसिद्ध करण्यात येईल, या आदेशामुळे हे स्पष्ट झाले आहे की वाडीतील प्रभाग 1 मध्ये पोटनिवडणूक होणार हे निश्चित झाल्याने राजकिय वातावरण पुन्हा क्रियाशील होणार हे स्पष्ट होते. तसेच पूर्व नगरसेवक श्याम मंडपे हे काय भूमिका घेतात या कडे ही सर्वा चे लक्ष राहील.