Published On : Wed, Feb 14th, 2018

एकलव्य विद्या संकुल प्रकल्पासाठी राज्य शासनातर्फे दोन कोटींचा निधी – मुख्यमंत्री

उस्मानाबाद :- समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम यमगरवाडी येथील भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या एकलव्य विद्या संकुलामार्फत करण्यात येत आहे. या प्रतिष्ठानच्या प्रकल्पासाठी राज्य शासनाच्यावतीने दोन कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.

तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी येथील एकलव्य विद्या संकुल येथे भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवी वर्ष सांगता समारंभ कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी, केंद्रीय केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग, नौकायन मंत्री नितीन गडकरी, लाहिरी गुरूजी, राष्ट्रीय भटके विमुक्त आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते, राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख, कौशल्य विकास व उद्योजकता, कामगार, भूकंप पुनर्वसन, माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, खासदार डॉ. सुनील गायकवाड, आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आदी उपस्थित होते.

Gold Rate
Monday 10 Feb. 2025
Gold 24 KT 85,600 /-
Gold 22 KT 79,600 /-
Silver / Kg 96,000 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, समाजातील शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचविण्याचा संकल्प या प्रतिष्ठानने केला आहे. त्या शेवटच्या घटकाला विकासाच्या मुख्य धारेत आणण्याचे काम या प्रकल्पाने केले आहे. ज्या-ज्या वेळी आपल्या देशात परकियांची सत्ता आली, तेव्हा या भटक्या विमुक्तांनी आपली संस्कृती आणि लोककला जपण्याचेही काम केले. या समाजाकडे असलेल्या परंपरागत कौशल्य आणि लोककलांना आधुनिकतेची जोड देऊन त्यांचे ब्रॅंडिंग करुन या लोककला आणि कौशल्य वैश्विक स्तरावर पोहचविण्याचे काम या श्री विश्वकर्मा औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून केले जाईल. सध्या देश प्रगतीकडे वाटचाल करीत आहे आणि संविधानाच्या माध्यमातून संविधानिक व्यवस्था निर्माण करुन या समाजातील वंचित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा प्रकल्प नक्कीच उपयुक्त ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राज्य सरकारकडून या समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र मंत्रालयाची निर्मिती करण्यात आली आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, या संस्थेच्या प्रलंबित मागण्या राज्यस्तरावर पोहोचवून त्या पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील. तसेच काही मागण्यांबाबत राज्य शासनाला धोरणात्मक आणि कायदेशीर निर्णय घ्यावे लागतील, त्यासाठी भटक्या-विमुक्त मंत्रालयातर्फे निर्णय घेतले जातील.

पाच कोटी रुपयांची मदत करणार: नितीन गडकरी
21 व्या शतकाकडे विकासाची कास धरायची असेल तर ज्ञान आणि तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. कौशल्य विकास आणि त्याचे शिक्षण ही काळाची गरज आहे. हेच कौशल्य शिक्षण भटके विमुक्त समाजाला दिले तरच त्यांची प्रगती होऊ शकेल, यातूनच हजारो तरुणांना रोजगार मिळतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

श्री. गडकरी यांनी या संस्थेच्या पायाभूत सुविधांसाठी जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टच्या औद्योगिक, सामाजिक दायित्व (सीएसआर) फंडातून पाच कोटी रुपये देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

यावेळी लाहिरी गुरुजी तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांचीही समयोचित भाषणे झाली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने दैनिक तरूण भारत व साप्ताहिक उस्मानाबाद समाचार या वृत्तपत्रांच्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच जात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांना अनुलोम सन्मित्र पुरस्काराने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

डॉ. सुवर्णा रावळ यांनी प्रतिष्ठानच्या वाटचालीबाबत प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणिता उमाकांत मिटकरी आणि तन्वी तोतडे व शर्विल आडे या विद्यार्थ्यांनी केले तर आभार रावसाहेब कुलकर्णी यांनी मानले.

Advertisement