नागपूर : स्वच्छ सर्वेक्षण सोमवारपासून सुरू होत आहे. त्यादृष्टीने महापौर नंदा जिचकार यांनी शनिवारी (ता.२४) नागपूर रेल्वे स्थानकाचा पाहणी दौरा केला. तेथील स्वच्छतेसंदर्भातील आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासमवेत मंगळवारी झोन सभापती सुषमा चौधरी, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, राजेश मोहिते प्रामुख्याने उपस्थित होते.
महापौर नंदा जिचकार यांनी रेल्वे स्थानकावर असलेल्या अस्वच्छेतेबाबत नाराजी व्यक्त केली. तेथील परिसर लवकरात लवकर स्वच्छ करण्यात यावा, असे निर्देश प्रशासनाला दिले. याबाबतीत रेल्वे प्रशासनाला स्वच्छ सर्वेक्षणाबाबत अवगत करण्यात यावे, त्यांना त्याची माहिती देण्यात यावी, असे सांगितले.
रेल्वे स्थानकावर अनधिकृत होर्डिंग्स लावण्यात आले आहेत. ते ताबडतोब काढण्यात यावे, असे निर्देश महापौरांनी दिले. तेथे स्वच्छ सर्वेक्षणाची जनजागृती करणारे होर्डिग्स लावण्यात यावे, असे निर्देशित केले. स्वच्छ सर्वेक्षणासंदर्भातील मोठी होर्डिग्स शहराच्या विविध ठिकाणी लावा, असेही प्रशासनाला सांगितले.
रेल्वे स्थानक ते मानस चौक या रस्त्यांवर विविध ठिकाणी कचरा आढळल्याने महापौर नंदा जिचकार आणि ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल यांनी संताप व्यक्त केला. हा कचरा त्वरित काढण्याचे प्रशासनाला सूचित केले. तेथील दूकानांसमोर असलेला कचराही तातडीने स्वच्छ करण्याचे दुकानदारांना सूचित केले. ज्यांच्या प्रतिष्ठानांसमोर अथवा दुकांनासमोर कचरा दिसेल त्यांना नोटीस बजाविण्यात यावा, असे आदेश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.
पाहणी दौऱ्याप्रसंगी सतरंजीपुरा झोन सहायक आय़ुक्त प्रकाश वराडे, गांधीबाग झोन सभापती अशोक पाटील, झोनल अधिकारी महेश बोकारे, राजेश गायकवाड उपस्थित होते.
कॉटन मार्केटपरिसराची पाहणी
यानंतर कॉटन मार्केट परिसराचा पाहणी दौरा केला. तेथील स्वच्छतेचा आढावा महापौर नंदा जिचकार यांनी घेतला. तेथील रस्त्यांवर कचरा आढळला. कचरा त्वरित स्वच्छ करण्यात यावा, असे निर्देश दिले. कॉटन मार्केट परिसराजवळ स्वच्छ सर्वेक्षणाची जनजागृती करणारे फलक लावण्यात यावे, असे निर्देश दिले. यावेळी त्यांच्यासमवेत धंतोली झोन सभापती प्रमोद चिखले, धंतोली झोन सहायक आय़ुक्त स्मिता काळे प्रामुख्याने उपस्थित होते.
कळमना येथील धान्य गोदामाला भेट
कळमना मार्केट येथील धान्य गोदामाला शनिवारी (ता. २४) पहाटे तीन वाजता आग लागली. त्यापार्श्वभूमीवर महापौर नंदा जिचकार यांनी घटनास्थळी भेट दिली व घटनेची माहिती जाणून घेतली. यासंदर्भात अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र न घेता धान्यसाठा केला कसा, असा सवाल महापौर नंदा जिचकार यांनी केला. याप्रकरणामध्ये जा दोषी असेल त्यांना नोटीस बजावण्यात यावा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. यावेळी त्यांच्यासमवेत उपमहापौर दीपराज पार्डीकर, नगरसेवक लहुकुमार बेहते, राजकुमार साहू, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, बी.पी.चंदनखेडे उपस्थित होते.