मुंबई: देशभरात नेत्रदान करण्यास इच्छुक नेत्रदात्यांसाठी असंख्य आय बँक कार्यरत आहेत. मात्र, नागरिकांमध्ये नेत्रदानाविषयीची उत्सुकता नसल्याचे दिसून येते. नागरिकांना याकरिता प्रवृत्त करण्यासाठी चळवळ उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे केले.
नेत्रदानाच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्हिजन फाऊंडेशन ऑफ इंडिया या स्वयंसेवी संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात आयोजित रैाप्य महोत्सवी कार्यक्रमप्रसंगी राज्यपाल चे. विद्यासागर राव बोलत होते. यावेळी समाजसेविका राजश्री बिर्ला, राष्ट्रीय कौशल्य विकास परिषदेचे अध्यक्ष पद्मभूषण विजेते एस. रामादोराई, व्हिजन फाऊंडेशन ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय विश्वस्त कुलीन कोठारी, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष नवीनभाई दवे, संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा आणि राहुल शर्मा, ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी सर्वप्रथम व्हिजन फाऊंडेशनच्या नेत्रदानाच्या क्षेत्रात गेल्या २५ वर्षांपासून सुरू असलेल्या कार्याचे कैातुक केले. व्हिजन फाऊंडेशनचे कार्य संस्मरणीय असून त्यांनी अनेक लोकांना दृष्टी देत त्यांचे आयुष्य प्रकाशमान केले आहे. या फाऊंडेशनच्या माध्यमातून आतापर्यंत दोन लाख ३५ हजार लोकांना फायदा झाला आहे. त्यात विशेषतः समाजातील दुर्बल घटक, ग्रामीण भागातील आणि झोपडपट्टीत वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांचा समावेश आहे. या फाऊंडेशनकडून राष्ट्रीय नेत्र यज्ञ हा उपक्रम राबविण्यात येत असून हा उपक्रम स्तुत्य असल्याचे गैारवोद्गार राज्यपालांनी यावेळी काढले.
ते म्हणाले की, जगभरात ३७ मिलियन नागरिक अंध आहेत. त्यात १८ मिलियनहून जास्त नागरिक हे आपल्या देशातील आहे. देशातील दृष्टीहीनांची ही संख्या लक्षणीय आहे. हे रोखण्यासाठी येत्या काळात राज्यातील सर्वच शाळातील विशेषतः ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी होणे गरजेचे आहे. या माध्यमातून दृष्टीदोष दूर होण्यास मदत होईल. यासोबतच राज्यात 3 मिलियनपेक्षा जास्त विद्यार्थी हे राज्यातील विविध विद्यापीठात शिक्षण घेत आहेत. या महाविद्यालयीन तरुणांनी अवयवदानासाठी विशेषतः नेत्रदानासाठी स्वयंस्फूर्तीने पुढे येण्याची गरज असल्याचे राज्यपाल यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमानंतर सुप्रसिद्ध संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा आणि राहुल शर्मा या पिता-पुत्रांची जुगलबंदी उपस्थितांना ऐकायला मिळाली.