कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणातील संशयित आरोपी मिलिंद एकबोटे यांना आज अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
कोरेगाव-भीमा येथे १ जानेवारी रोजी शौर्यस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या अनुयायांवर हल्ला करण्यास चिथावणी दिल्याचा आरोप एकबोटेंवर ठेवण्यात आला आहे. अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी एकबोटे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, पोलिसांना तपासात सहकार्य करत नसून चौकशीदरम्यान जाणीवपूर्वक चुकीची आणि अर्धवट माहिती देत आहेत.
त्यामुळे त्यांची पोलीस कोठडीतील चौकशी अपरिहार्य आहे, असे सांगत राज्य सरकारने त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाला सर्वोच्च न्यायालयात तीव्र विरोध दर्शवला होता. एकबोटेंच्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी एकबोटेंना अटक केली