नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी विविध बाबी लक्षात घेता, सूरज यादव खून प्रकरणात आणखी तीन आरोपींच्या शिक्षेवर स्थगिती देऊन त्यांना सशर्त जामीन मंजूर केला.
मेहरोज हुसैन झैदी, पप्पू झाडे व मनमितसिंग अशी आरोपींची नावे आहेत. यापूर्वी मुख्य आरोपी डल्लू सरदार ऊर्फ नरेंद्रसिंग दिगवा याला शिक्षेवर स्थगिती देऊन सशर्त जामीन मंजूर करण्यात आला होता. १८ नोव्हेंबर २०१२ रोजी लष्करीबाग येथील रहिवासी प्रॉपर्टी डीलर सूरज यादव याचा भरदिवसा दुपारी ३.३० च्या सुमारास सशस्त्र हल्ला करून खून करण्यात आला. तसेच, सूरजची गरोदर पत्नी मनदीपकौर व भाऊ राजेश यादव यांनाही जखमी करण्यात आले. सूरजच्या मेव्हण्याच्या मित्राचा झिंगाबाई टाकळी येथील १४ हजार चौरस फुटाचा भूखंड हडपण्यातून हे हत्याकांड घडले. सत्र न्यायालयाने या प्रकरणात नऊ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून, सहा आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. शिक्षा झालेल्या आरोपींनी सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. त्यात सदर तीन आरोपींचा समावेश आहे. त्यांनी अपीलवर निर्णय होतपर्यंत शिक्षेवर स्थगिती व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. आरोपींतर्फे अॅड. राजेंद्र डागा, अॅड. आर. के. तिवारी व अॅड. मीर नगमान अली यांनी बाजू मांडली.