Published On : Fri, Mar 23rd, 2018

मोदींकडून 125 कोटी देशवासीयांचा भ्रमनिरास, हार्दिक पटेल यांनी दीक्षाभूमीवरून साधला निशाणा


नागपूर: विमानातील प्रवाशांना योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी कुशल वैमानिकाची आवश्‍यकता असते. तद्वतच देशाच्या 125 कोटी लोकांच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी देशाला चांगल्या पंतप्रधानांची गरज आहे. मात्र, देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी सपशेल अपयशी ठरल्याची टीका पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी नागपुरात केली. मोदींकडून जनतेचा भ्रमनिरास झाला असून अच्छे दिनची आशा मावळल्याचे ते म्हणाले.

अकोला येथे एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी नागपुरात आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते. नागपुरात आल्यानंतर प्रथम त्यांनी दीक्षाभूमीवर जाऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींचे दर्शन घेतले. “गेल्या चार वर्षात मोदी सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. नरेंद्र मोदींबद्दल लोकांना मोठ्या अपेक्षा होत्या. शेतकऱ्यांना दामदुप्पट भाव देऊ, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करू, असे आश्‍वासन दिल्यानंतरही शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ झाली आहे, विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे अच्छे दिन कुठे आहेत?, असे जनता विचारत आहे.

विमानातील प्रवाशांचे जीवन वैमानिकाच्या हातात असते. त्याचप्रमाणे देशातील सव्वाशे कोटी लोकांचे भवितव्य पंतप्रधानांच्या हातात असते. परंतु देशाचा वैमानिक संपूर्णपणे अपयशी ठरला असून आता त्यांच्या हातात देश ठेवणे धोक्‍याचे ठरणार आहे,’ असा इशारा पटेल यांनी दिला. हिरे व्यापारी नीरव मोदी यांनी केलेला पीएनबी घोटाळ्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना होती, असा आरोप हार्दिक पटेल यांनी केला. पीएनबी घोटाळ्याबद्दल आपला नाइलाज असल्याचे वक्तव्य मोदींनी केले आहे. यावरून त्यांना या घोटाळ्याची पूर्वकल्पना होती, हे स्पष्ट होते. या घोटाळ्याची पूर्वकल्पना असतानाही मौन साधणे हा देशद्रोह ठरत नाही काय? असा सवाल त्यांनी केला.

Gold Rate
Monday 10 Feb. 2025
Gold 24 KT 85,600 /-
Gold 22 KT 79,600 /-
Silver / Kg 96,000 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement