Published On : Wed, Mar 28th, 2018

मंडी टोळी आणि ‘त्या’ मंत्र्याच्या संबंधांची गुप्तचर विभागाकडून चौकशी करा!

Advertisement

Vikhe Patil
मुंबई: विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज पुन्हा विदर्भातील कुख्यात मंडी टोळीवर हल्लाबोल केला. राज्यातील एक मंत्रीच या टोळीचा तारणहार असल्याच्या आरोपाचा त्यांनी पूनरूच्चारही केला. मुख्यमंत्र्यांना या प्रकरणातील वस्तुस्थिती जाणून घ्यायची असेल तर गुप्तचर विभागामार्फत चौकशी करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली.

अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना विखे पाटील यांनी मंडी टोळीच्या कारवायांचा पर्दाफाश केला. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात मंत्र्यांकडून चुकीची माहिती दिली जाते आहे. राजकारणाचे मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीकरण झाल्याने सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले असून, कोणाचेही सरकार असले तरी याविरूद्ध कठोर कारवाईचीच भूमिका घेतली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी राजकारणातील गुन्हेगारीला थारा देऊ नये. हे दुधारी शस्त्र आहे, याची जाणीव मुख्यमंत्र्यांनी ठेवावी, असा सूचक इशारा विखे पाटील यांनी दिला.

पुढे बोलताना ते म्हणाले की, ही टोळी गरजूंना महिना १० टक्के व्याज दराने कर्ज वाटते. असंख्य लहान व्यापारी, शासकीय-खासगी कर्मचारी या अवैध सावकारीच्या विळख्यात फसले आहे. कर्जाची वसुली झाली नाही तर दिवसाढवळ्या कर्जदाराच्या घरात घुसून शस्त्रांच्या धाकावर महिलांची मागणी केली जाते. मुलीबाळींवर अत्याचार केले जातात. ही बेअब्रू सहन न झाल्याने अनेक नागरिकांना शहर सोडावे लागले आहे. सरकारची निष्पक्ष चौकशी करण्याची तयारी असेल तर अशा लोकांची यादी द्यायलाही आपण तयार असल्याचे विरोधी पक्षनेत्यांनी यावेळी सांगितले.

Gold Rate
Thursday 09 Jan. 2025
Gold 24 KT 77,900 /-
Gold 22 KT 72,500 /-
Silver / Kg 90,600 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

८ डिसेंबर २०१७ रोजी संजय कैपिल्यवार नामक व्यापाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्या का केली, याची सरकारने चौकशी करण्याची गरज आहे. ३१ डिसेंबर २०१७ रोजी भारतीय जनता पक्षाच्या व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष हितेश गंडेचा यांनी एमआयडीसीतील आपल्या बेसन मीलमध्ये आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी हिंदीमध्ये दोन ओळींचे पत्र लिहिले होते. त्यामध्ये “मेरे बाद मेरे घरवालों को लेनदार परेशान ना करें…” असे त्यांनी लिहून ठेवले होते. या पत्रात उल्लेख असलेला ‘लेनदार’ कोण? असा प्रश्न करून भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्याची ही शोकांतिका असेल तर सर्वसामान्य नागरिकांचे काय? अशीही विचारणा विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना केली.

मंडी टोळी आणि मंत्र्यांच्या संबंधावर केवळ विरोधी पक्षाने नव्हे, तर भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनेही पत्रकार परिषद घेऊन संबंधित मंत्र्याला तातडीने पदावरून हटविण्याची मागणी केली, याकडे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारचे लक्ष वेधले. मंडी टोळीकडे ४ हजार देशी कट्टे आणि विदेशी बंदुका आहेत. पोलिसांकडेही नसतील, अशी घातक शस्त्रे त्यांच्याकडे आहेत. या टोळीतील २०-२२ वर्षांची मुलेही कमरेला दोन-दोन कट्टे खोचूनच बाहेर पडतात. गुन्हेगारीवरून कधी काळी बिहारला नावे ठेवली जायची. पण मंडी टोळीने या शहराची अवस्था बिहारपेक्षाही वाईट करून ठेवल्याचे विरोधी पक्षनेते म्हणाले.

शाम जयस्वाल यांचा गुन्हेगारीशी काहीही संबंध नसल्याचा दावा भाजपकडून केला जातो आहे. परंतु, हा दावा खोटा असल्याचे सांगून विखे पाटील यांनी शाम जयस्वाल यांचे नाव असलेली स्थानिक गुन्हे शाखेकडील मंडी टोळीच्या गुंडांची यादीच विरोधी पक्षनेत्यांनी सभागृहात सादर केली. बंटी जयस्वाल हा या टोळीतील दुसरा प्रमुख गुंड असून, तो भाजपचा स्विकृत नगरसेवक होता. मंडी टोळीच्या सर्व वसुलीची कामे आज तोच करतो. मंत्र्यांच्या छायाचित्रासह शहरात त्याची अनेक फलके झळकत असतात. असेच काही फलक रामनवमीच्या निमित्ताने लावण्यात आली होती. परंतु, ही बाब विधानसभेत मांडल्यानंतर रातोरात हे सारे फलक हटविण्यात आले. मंत्र्यांचा आणि टोळीचा संबंध नव्हता तर ही फलके का हटविण्यात आली, असाही प्रश्न विखे पाटील यांनी विचारला.

मंडी टोळीशी संबंधित मंत्र्याचे नाव असलेल्या रूग्णवाहिकांमधून दारूबंदी असलेल्या वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात दारूची तस्करी केली जाते. अवैध सावकारी, दारू तस्करी, खंडणीवसुली अशा अनेक धंद्यातून उभ्या राहिलेल्या अफाट पैशातून या टोळीशी संबंधित लोकांनी यांनी अलिकडेच नागपुरात सव्वाशे एकर जागा खरेदी केली. त्याचेही पुरावेही आपण सादर करणार असल्याचे विरोधी पक्षनेते राधाकृ्ष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

मंत्री आणि गुन्हेगारी टोळीची ही दहशत अशीच सुरू ठेवायची की थांबवायची, याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यायचा आहे. मंडी टोळीचा एका मंत्र्याशी किती घनिष्ठ संबंध आहे, हे ‘ओपन सिक्रेट’ आहे. या शहरातील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. गुंडांना टोळीला राजाश्रय देण्याची किंमत सर्वसामान्य जनतेला चुकवावी लागते आहे, या शब्दांत विखे पाटील यांनी सरकारला यासंदर्भातील गंभीर परिस्थिती निदर्शनास आणून दिली.

Advertisement