जळगाव : नवे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या शासनाचा प्रयत्न असून जैन इरिगेशनसारख्या संस्था या क्षेत्रात पुढे आल्यास शासनातर्फे त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज येथे केले.
जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. तर्फे अखिल भारतीय पातळीवर कृषि क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या पद्मश्री डॉ. अप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्कार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते वडनेर भैरव (ता. चांदवड, जि. नाशिक) येथील प्रगतीशील तरुण शेतकरी अविनाश मनोहर पाटोळे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती उज्ज्वला पाटील, महापौर ललित कोल्हे, खासदार रक्षा खडसे, आमदार सर्वश्री. चंदूलाल पटेल, एकनाथराव खडसे, डॉ. सतीश पाटील, संजय सावकारे, हरिभाऊ जावळे, सुरेश भोळे, चंद्रकांत सोनवणे, किशोर पाटील, शिरीष चौधरी, उन्मेष पाटील, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे, कवी ना. धों. महानोर, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी मंत्री सुरेशदादा जैन, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, गुणवंत सरोदे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, अनिल जैन आदी उपस्थित होते.
श्री. फुंडकर म्हणाले, पुरस्कारप्राप्त शेतकरी श्री.पाटोळे यांनी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करुन उत्पादनात वाढ केली. त्यामुळे अन्य शेतकऱ्यांना प्रेरणा मिळेल. ज्यांच्या नावाने हा पुरस्कार देण्यात येतो त्या डॉ. अप्पासाहेब पवार यांनी राज्यातील कृषी क्षेत्रात भरीव काम केले असून शेतकऱ्यांना नवी दिशा दिली आहे. शेताकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे असेच कार्य जैन इरिगेशन मार्फत करण्यात येत असून शेतीशी निगडीत विविध क्षेत्रात या संस्थेचे कार्य उपयुक्त असे आहे. कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या अशा संस्थांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
श्री. लोणीकर म्हणाले, नवनवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतीचे उत्पन्न वाढले आहे. मात्र, विपणनात शेतकरी मागे आहे. या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यात फक्त शेतकऱ्यांची औद्योगिक वसाहत उभारण्यात येणार आहे. बचत गटाच्या माध्यमातून या औद्योगिक वसाहतीत शेतमालावर प्रक्रिया करुन तो बाजारपेठेत पाठविण्यात येणार आहे. हे काम आता अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. हुशार तरुणांनी आता शेती कसण्यासाठी पुढे येत नवतंत्रज्ञानाचा वापर करण्याबरोबर विक्री कलाही आत्मसात केली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
श्री. पवार म्हणाले, चांदवडसारख्या अवर्षणप्रवण तालुक्यात आधुनिक पद्धतीने शेती करीत अविनाश पाटोळे यांनी यश मिळविले आहे. डॉ. अप्पासाहेब पवार यांना अशाच प्रकारची नवीन पिढी अपेक्षित होती. कापसावरील बोंडअळी, गव्हावरील तांबेरा, केळीवरील करपा रोग अशा कृषीविषयक प्रश्नांकडे शेतीतज्ज्ञ व संशोधकांनी लक्ष केंद्रित केले पाहिजे. शेतमालाची किंमत वाढली, तर महागाई वाढते हा विचार आता बदलण्याची गरज आहे. तसेच शेतीत आधुनिक पद्धतीचा अवलंब करीत नवनवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे आवश्यक आहे. शेती क्षेत्रातील नवनवीन बदल व संशोधनाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविली, तर शेतीत बदल घडून येतील, असे त्यांनी सांगितले. त्यांनी भवरलाल जैन व अप्पासाहेब पवार यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला.
सत्काराला उत्तर देताना श्री. पाटोळे म्हणाले की, सुरुवातीला वडिलांना मदत म्हणून शेतीस सुरुवात केली. त्यानंतर शेतीत आधुनिक व नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्याने यश मिळाल्याचे सांगितले. संकटातून मार्ग काढताना वडील मनोहर पाटोळे यांच्यासह कुटुंबियांचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी नमूद केले.
अप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्कार दर दोन वर्षांनी दिला जातो. या पुरस्काराचे यंदा १४ वे वर्ष आहे. सन्मानचिन्ह, दोन लाख रुपये व पुरस्कारार्थींचा सपत्नीक सत्कार असे पुरस्काराचे स्वरुप आहे. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र अशा पाच महसूल विभागातून शेतकऱ्याची निवड या पुरस्कारासाठी केली जाते. यावर्षी उत्तर महाराष्ट्रातून ही निवड करण्यात आलेली आहे. पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष तथा दापोली कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एस. मगर व निवड समितीच्या सदस्यांनी ५० शेतकऱ्यांमधून श्री. पाटोळे यांची निवड केली आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल जैन यांनी केले. ज्योती अंबेकर यांनी सूत्रसंचालन केले. अशोक जैन यांनी आभार मानले. यावेळी शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.