नागपूर : गेल्या दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या चिमुकल्याचा मृतदेह पोत्यात मिळाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. वंश ओमप्रकाश यादव (वय ८ वर्षे) असे मृत बालकाचे नाव आहे. तो प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खामल्यात राहत होता. त्याचे अपहरण करणाऱ्याने ही हत्या केली असावी, असा संशय आहे.
२७ मार्चला वंश अचानक बेपत्ता झाला होता. त्याचे अपहरण झाले असावे, असा संशय पालकांनी पोलिसांकडे नोंदविलेल्या तक्रारीत व्यक्त केला होता. पोलिसांनी अपहरणाची नोंद केली. मात्र, फारसा गांभिर्याने तपास केला नाही. मुलांचे आईवडील आणि या भागातील सामाजिक कार्यकर्ते चिमुकल्या वंशचा गेल्या दहा दिवसांपासून शोध घेत होते. गुरुवारी सकाळी ७ वाजता सोेनगाव तलावाच्या कोरड्या भागातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एका पोत्यातून दुर्गंध येत असल्याने आजुबाजूच्यांनी चौकशी केली. पोत्यात बालकाचा मृतदेह असल्याचे लक्षात येताच पोलिसांना कळविण्यात आले.
ठाणेदार पांडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. बालकाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. त्याच्या शरीरावरचे कपडेही फाटले होते. पोलिसांनी लगेच श्वानपथक तसेच ठसे तज्ज्ञांना बोलवून घेतले. माहिती कळताच गुन्हे शाखेचे पथकही पोहचले. दरम्यान, शहरातील कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत बालकाच्या बेपत्ता होण्याची नोंद आहे, त्याची सोनेगाव पोलिसांनी माहिती घेतली. प्रतापनगर ठाण्यातून २७ मार्चला वंश बेपत्ता झाल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे पोलिसांनी वंशच्या नातेवाईकांना घटनास्थळी बोलवून घेतले. त्यानंतर या भागातील सामाजिक कार्यकर्ते वंशच्या नातेवाईकांना घेऊन तेथे पोहचले. वंशचा मृतदेह पाहून त्याचे आईवडील बेशुद्धच पडले. शुद्धीवर आल्यानंतर त्यांची एकच आक्रोश केला.
तीन दिवसांपूर्वीच फेकला मृतदेह
चिमुकल्याचे अपहरण करून हत्या केल्याचे वृत्त पसरताच शहरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी धावपळ सुरू केली. या भागातील सामाजिक कार्यकर्ते पंजू तोतवाणी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह परिसरात चौकशी केली असता एका आॅटोवाल्याने त्यांना संशयीत आरोपीचा धागा दिला. राजा नामक तरुणाने तीन दिवसांपूर्वी सोनेगाव तलावात पाणी किती आहे, अशी विचारणा केली होती. त्यामुळे या अपहरण आणि हत्याकांडाशी त्याचा संबंध असावा, असा दाट संशय निर्माण झाला. ही माहिती तोतवाणी यांनी प्रतापनगर आणि सोनेगाव ठाण्यात दिली. पोलिसांनी संशयीत आरोपीला ताब्यात घेतले. वृत्त लिहिस्तोवर आरोपीची चौकशी सुरू होती.