पुणे (शिरुर): शिक्षक भरत्या बंद…विषयांचे शिक्षक नसल्याने शाळा बंद होत आहेत… अंगणवाडी सेविकांना न्याय नाही… एस. टी. कर्मचाऱ्यांना दिलासा नाही… माथाडी कामगारांना न्याय नाही… नोकऱ्या मिळू नये म्हणून गलिच्छ राजकारण करत असल्याचे सांगतानाच यांचं नेमकं काय दुखणं आहे हेच तपासण्याची वेळ आली आहे असे प्रतिपादन विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी शिरुरच्या जाहीर सभेत केले.
फाईव्हस्टार एमआयडीसी कुणामुळे झाली असा सवाल करतानाच ही साहेबांची दुरदृष्टी आहे असेही स्पष्ट केले. पुणे,पिंपरी-चिंचवडची आज काय अवस्था आहे.जनतेच्या प्रश्नांची जाण या सरकारला नाही. गल्ली ते दिल्लीपर्यंत यांची सत्ता आहे.परंतु समाजातील सर्वचं घटकांची आज वाईट अवस्था आहे.
जीएसटीमुळे व्यापाऱ्यांचे तर कंबरडेच मोडले आहे.कंपोष्ट खताला जीएसटी लावत आहे असे हे नादान सरकार असल्याचा आरोप अजितदादांनी केला.
शेतकऱ्यांना चांगले दिवस आणायचे असतील तर सर्वात जास्त खासदार पाठवा आणि शरद पवार साहेबांची ताकद वाढवा असे आवाहन दादांनी केले. सभेत दादांनी मागील निवडणूकीत झालेल्या चुकांबाबत कार्यकर्त्यांना काही सूचनाही केल्या.
शिरुरमध्ये ताकद असतानाही पराभव होतो;आत्मचिंतनाची गरज – खासदार सुप्रिया सुळे
आजची सभा घरची आहे. ताकद सभेला खूप दिसत आहे. लोक आपली आहेत. मग लोकसभेला, विधानसभेला पराभव का होतो. आत्मचिंतन करण्याची गरज आहे असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी शिरुरच्या जाहीर सभेत व्यक्त केले.
प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायला हवे.मनातलं जाणून घ्या.मनातल्या भावना समजुन उमेदवार दिला तर शिरुरमध्ये परिवर्तन दिसेल असेही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
आजच्या सभेतून इथे परिवर्तन घडणार आहे हे स्पष्ट होत आहे.शिरुर मतदारदारसंघातील खासदार,आमदार निवडुन दिलात तर बारामतीपेक्षा जास्त कामे होतील असे आश्वासनही सुळे यांनी दिले.
लाल आंदोलनाबाबत मला संसदेच्या काही सदस्यांनी दिल्लीत विचारलं.त्या एका खासदारानं यामागे शरद पवार आहेत असं सांगितले.जेव्हा शेतकऱ्यांचे प्रश्न येतात तेव्हा देशातील माणूस शरद पवारांकडे अपेक्षेने बघतो आहे असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्राची वयोश्री,महिला सुरक्षा अँपबाबत माहिती दिली.शिवाय त्यांनी चाकणला होणारी ब्रिटानिया कंपनीबाबत मुख्यमंत्री निर्णय घेत नाहीत. ही कंपनी दुसऱ्या ठिकाणी गेल्यास त्याला मुख्यमंत्री जबाबदार असतील असेही सुळे यांनी स्पष्ट केले.
हा माझा हा तुझा असं न करता पक्षासाठी काम करा,संघटना मोठी करा,मतभेद बाजुला ठेवा. दादा, तटकरे जो उमेदवार देतील तो राज्यासाठी असेल त्यामुळे २०१९ मध्ये येईन तो गुलाल उधळायला असे आश्वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले.
सरकारची अंत्ययात्रा काढल्याशिवाय राष्ट्रवादी गप्प बसणार नाही- धनंजय मुंडे
भाजप-सेनेला सत्तेतून बाहेर काढून त्यांची अंत्ययात्रा काढल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गप्प बसणार नाही असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिरुरच्या जाहीर सभेत सरकारला दिला.
गेले नऊ दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हल्लाबोलच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढत असून सध्या हल्लाबोल पश्चिम महाराष्ट्रात सुरु आहे. यामध्ये धनंजय मुंडे यांची मुलुखमैदान तोफ धडाडत आहे. त्यांच्या आक्रमक शैलीतील भाषणाला चांगला प्रतिसादही मिळत आहे. आजही शिरुरच्या जाहीर सभेत धनंजय मुंडे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरु केलेल्या हल्लाबोल आंदोलनामध्ये विधीमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी नाकर्त्या सरकारने जनतेला जी खोटी आश्वासने दिली त्याचा पोलखोल चित्रफितीद्वारे केला.आजच्या शिरुरच्या जाहीर सभेतही जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री आणि अमित शहा,पंतप्रधान यांनी जनतेला कसं फसवलं हे चित्रफितीद्वारे दाखवले.
सरकाविरोधातील लढाई घराघरात-गावागावात पोचवा – दिलीप वळसेपाटील
नुसता नेत्यांचा जयजयकार नको,अजितदादा तुम आगे बढो नको तर तुमच्या मनात जे आहे ते घडवायचं असेल,दादांना नेतृत्व म्हणून पहायचे असेल तर ही लढाई घराघरात,गावागावात पोचवण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसेपाटील यांनी शिरुरच्या जाहीर सभेत केले.
आपल्याला शिरुर-हवेली विधानसभेचे जागा निवडून आणता आली नाही. जिल्हापरिषदेमध्ये, बॅंकामध्ये चांगली कामगिरी केली तर लोकसभा, विधानसभेत आपण मागे का राहिलो असा सवाल दिलीप वळसेपाटील यांनी केला.
सभेत राष्ट्रीय सरचिटणीस डी.पी.त्रिपाठी, माजी आमदार पोपटराव गावडे, प्रदीप कंद, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आपले विचार व्यक्त केले.
या सभेला विधीमंडळ पक्षनेते अजित पवार,खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधीमंडळ गटनेते जयंत पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसेपाटील, पक्षाचे सरचिटणीस डी. पी. त्रिपाठी, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार राहुल जगताप,आमदार जयदेव गायकवाड, जिल्हाध्यक्ष जालिंदर कामते, जिल्हापरिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, माजी आमदार सुर्यकांत पालांडे, माजी आमदार पोपटराव गावडे, माजी जि. प. अध्यक्ष प्रदीप कंद, सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव आदींसह शिरुर, हवेली, आंबेगाव परिसरातील पदाधिकारी,कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.