मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या चवदार तळ्याच्या साक्षिने सामाजिक क्रांतीची सुरुवात केली त्या महाड येथिल चवदार तळ्याला केवळ ऐतिहासिकच नव्हे तर धार्मिक महत्वही प्राप्त झाले आहे. या तळ्याल्या भेट द्यायला जगभरातून आंबेडकर अनुयायी येत असतात. इथले पाणी श्रद्धेने पितात. आणि म्हणूनच इथल्या पाण्याचे शुद्धीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या तळ्यातील गाळ उपसून जलशुद्धीकरण यंत्र बसविण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती व तंत्रज्ञान, अन्न व नागरी पुरवठा आणि रायगडचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज येथे दिली.
सह्याद्री अतिथी गृह येथे पार पडलेल्या या बैठकीला आमदार प्रशांत ठाकुर, आमदर सुभाष पाटील, आमदार भरतशेठ गोगावले, आमदार प्रविण दरेकर, माजी आमदार माणिक जगताप, महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप ,भंदन्त राहुल बोधी यांच्यासह अनेक प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते. श्री. चव्हाण पुढे म्हणाले,चवदार तळ्यातील पाण्याचे नमुने अणूजीव शास्त्रज्ञ यांच्याकडे जैविक आणि रासायनिक तपासणी करिता पाठविले असता तपासणी अहवालात हे पाणी पिण्यायोग्य नाही असे आढळले. या पाण्यावर योग्य ती प्रक्रीया करणे आवश्यक होते. या तळ्यावर 20 मार्च रोजी महाड सत्याग्रहाच्या वर्धापन दिवशी, बुद्ध पौर्णिमेला, 14 एप्रिल आंबेडकर जयंतीला, 06 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनाला आणि 25 डिसेंबर मनुस्मृती दहन दिवसाला मोठ्या प्रमाणात जनसमुदाय एकत्रित होत असतो.
इथे असलेल्या पाणी समस्येचे निराकरण करण्यासाठी सुमारे एक कोटी 37 लाख रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे. यात तळ्यातील गाळ काढणे, आजुबाजूच्या सांडपाण्याचा शिरकाव थांबविणे, पाणी शुद्धीकरणाकरता प्रेशर सॅण्ड फिल्टर व कार्बन फिल्टर यंत्र बसविणे, पाण्यातील आक्सिजन वाढविण्यासाठी तरंगते एरियेटर बसविणे, भाविकांना शुद्ध पाणी नळाद्वारे मिळेल याची व्यवस्था करणे आणि तलावात मासे व कासव सोडणे आदि उपाय योजना करण्यात येणार आहेत. हे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
महाडचे चवदार तळे
- सन 1866 मध्ये महाड नगर पालिका स्थापन झाली व 20 मार्च 1927 रोजी; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांसाठी खुले केले.
- ज्या ठिकाणी चवदार तळे आहे त्याच ठिकानी पुर्वी 14 विहीरी होत्या म्हणून या तळ्याचे नाव चवदार तळे म्हणून पडले.
- या तळ्यावर 20 मार्च रोजी महाड सत्याग्रहाच्या वर्धापन दिवशी, वैशाख महिन्यातील बुद्ध पौर्णिमेला, 14 एप्रिल आंबेडकर जयंतीला, 06 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनाला आणि 25 डिसेंबर मनुस्मृती दहन दिवसाला मोठ्या प्रमाणात जनसमुदाय एकत्रीत होत असतो.
- या तळ्याचे क्षेत्रफळ 12,568 चौ. मी. आहे. पावसाळ्यात 5.00 मी. तर उन्हाळ्यात 2.50मी. पाण्याची खोली असते. पावसाळ्यात 63 दश लक्ष लिटर आणि उन्हाळ्यात 32 दश लक्ष लिटर एवढी पाणी क्षमता आहे.
- गाळ काढणे, काही ठिकाणी गटार बांधणे व इतर अनुषंगिक कामे, 2 लक्ष लिटर प्रतितास क्षमतेचे जलशुद्धीकरण यंत्र बसविणे, एरियेटर बसविणे व विद्युत पुरवठा करणे या कामांसाठी एकुण खर्च 1 कोटी 32 लाख रुपये एवढा प्रस्तावित आहे.
- महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ यांच्या माध्यमातून हे काम करण्यात येणार आहे.