नागपूर: नागपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पेंच जलाशयाच्या पाईप लाईनला घोगली गावानजिक गळती लागली. यामुळे नागपूर शहराचा पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. सदर जागेची पाहणी करीत गळती दुरुस्तीचे कार्य युद्धपातळीवर पूर्ण करा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.
यावेळी त्यांच्यासोबत जलप्रदाय समितीचे सभापती विजय (पिंटू) झलके, कार्यकारी अभियंता अनिरुद्ध चौगंजकर, उपअभियंता (नद्या व सरोवरे) मो. इसराईल होते. पेंच जलाशयातून नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला गुरुवारी (ता. १२) ला घोगली गावानजिक श्री. नारे यांच्या शेताजवळ गळती लागल्याचे लक्षात आले. नागपूर महानगरपालिकेला ही माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी दौरा केला. या दौऱ्यानंतर तातडीने दुरुस्तीचे कार्य सुरू करण्यात आले.
या दुरुस्तीची प्रगती पाहण्यासाठी महापौर नंदा जिचकार आणि जलप्रदाय समितीचे सभापती विजय (पिंटू) झलके यांनी दौरा केला. अधिकाऱ्यांकडून संपूर्ण माहिती घेतली. शनिवारी (ता. १४) दुपारनंतर दुरुस्तीचे कार्य पूर्ण होईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता चौगंजकर यांनी दिली. दुरुस्तीत कुठलीही अडचण येता कामा नये. तातडीने दुरुस्ती करून पाणी पुरवठा सुरळीत करा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.