कन्हान: गोंडेगाव परिसरातील नागरिकांचे प्रश्न वेकोलीने तत्काळ न सोडविल्यास वेकोली प्रशासनावर वेळ पडल्यास भाल्याने प्रहार करण्यास मागेपुढे पाहणार नाही असा सज्जड इशारा आ. बच्चु कडू यांनी दिला.
गोंडेगाव येथील गांधी चौकात प्रहार संघटनेच्या वतीने आ. बच्चु कडू यांचा विविध विषयांवर गुरुवारी (ता.१२) जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. वेकोली प्रकल्पबाधित गोंडेगाव, घाटरोहना, वराडा , जुनी कामठी, एंसबा, बखारी, नांदगाव, टेकाडी, पिपरी व कांद्री परिसरातील नागरिकांच्या समस्या गेल्या २४ वर्षापासून जसेच्या तसे आहे. येथील स्थानिक राज्यकर्त्यांमध्ये इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळे पुनर्वसन, भुसंपादन, अनुदान, प्लाॅट वाटप, पर्यावरण रक्षण व धुळीच्या समस्या जसेच्या तसे आहे. जिथे कमिशन भेटते ते काम पहिले होते अशी व्यवस्था असल्याने विकास भकासाकडे चालला आहे. जनसामान्यांचा नेता म्हणून वागणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धर्मा पाटिल यांच्या आत्महत्येनंतर राजीनामा देऊन जनतेत जायला हवे होते मात्र फडणवीस ढोंगी राजकारणी ठरले. भाजपच्या नेत्यांनी संसदेसाठी नव्हे तर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांसाठी आत्मक्लेश करायला हवा होता अशी कोपरखळी मारली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच नितेश राऊत यांनी करून वेकोलिच्या अन्यायाविरोधात पाढा वाचला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रामटेक नगरपरिषद रमेश कारेमोरे, नरेंद्र पहाडे , सरपंच नितेश राऊत, राजु भडके उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन आनंद रामेलवार (नगरधन) यांनी तर आभार तुळशीराम पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी उपसरपंच विनोद सोमकुंवर, सुभाष डोकरीमारे, श्रीकांत बावनकुळे, मोरेश्वर शिंगणे, रवींद्र पहाडे, महेंद्र भुरे, आकाश कोडवते, सुनील धुरिया, आशिना वासनिक, रेखा काळे, यशोदा शेंदरे, ललिता पहाडे, पूजा रासेगावकर, निर्मला सरवरे, बैसाखू जनबंधू, रविंद्र पहाडे, आकाश दिवटे, देविदास तडस, विठ्ठल ठाकुर, श्रीकांत बावनकुळे , गुणवंता आंबागडे, अतुल कडु, अशोक पाटील, भगवान सरोदे , संगिता वांढरे, ललिता ठाकुर आदीने सहकार्य केले . कार्यक्रमास परिसरातील ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.