नागपुर: सदोष अभियांत्रिकी संरचनेमुळे कोराडी उड्डाणपूलानजीकच्या नागरिकांना मुख्य शहरात येण्यासाठी गैरसोय होत असे. यासाठी निर्मितीच्या वेळीच रुंद रस्ते, पिलर्स , अंडरपास यांच्या संदर्भातील अभियांत्रिकी संरचना अचूक असणे आवश्यक होती. नागरिकांची होणारी गैरसोय व अपघात टाळण्याच्या हेतूने रेल्वे विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या सहकार्याने रेल्वे अंडरपासची निर्मिती आता करण्यात आली आहे , असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री आणि केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर येथे केले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे नागपुर- बैतुल राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 47 वरील ओमनगर रेल्वे क्रॉसींगजवळील मानकापूर रेल्वे भुयारी मार्गाच्या लोकार्पण समारंभाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी उद्घाटक म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे उर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यसभा खासदार डॉ. विकास महात्मे, महापौर नंदा जिचकार, जि.प.अध्यक्षा निशा सावरकर , सर्वश्री आमदार डॉ. मिलिंद माने, सुधाकर देशमुख व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे नागपुरचे क्षेत्रीय अधिकारी चंद्रशेखर उपस्थित होते.
नागपुर- बैतुल राष्ट्रीय महामार्ग ओमनगर रेल्वे क्रॉसींगजवळील मानकापूर रेल्वे भुयारी मार्गाच्या मागणीसाठी जनआंदोलने झालीत यामध्ये महिलांचा विशेष सहभाग होता. पण आता या अंडरपासच्या निर्मितीमुळे हा प्रश्न सुटला असुन नागरिकांनीही पावसाळ्याच्या दिवसात या अंडरपासच्या देखरेखीत सहकार्य करणे आवश्यक असल्याचे गडकरी यांनी याप्रसंगी सांगितले. कळमेश्वर, सावनेर परिसरातील नागरिकांना नागपूर शहरात येणे सोयीचे व्हावे याकरीता या ब्रॉडगेज रेल्वे मार्गावरून मेट्रो कोचेस संचालित करुन महामेट्रोला संलग्न करण्याचा निर्णय झाला आहे. यामुळे मेट्रो सारखीच पर्यायी वाहतूक व्यवस्था या परिसरात होईल,असे त्यांनी यावेळी नमुद केले.
नागपूरातील शैक्षणिक संस्था तसेच पायाभूत सुविधेमुळे रोजगार निर्मिती होत असून नागपूरमध्ये उद्योजक व गुंतवणूकदारांसाठी पोषक वातावरणनिर्मिती झाली असल्याचे महाराष्ट्राचे मुख्यसमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने व तांत्रिक मार्गदर्शनाने बांधकामाच्या दृष्टीने कठीण असलेल्या या अंडरपासचा तिढा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा व रेल्वे विभागामार्फत सोडविला गेला, या बाबीचा मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी आवर्जून उल्लेख केला.
महाराष्ट्राचे उर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याप्रसंगी रेल्वे भुयारी मार्गाच्या पावसाळ्यात साचणा-या पाण्याच्या पम्पींग़साठी महानगरपालिकेतर्फे व्यवस्था निर्माण केली जावी, अशी सूचना केली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे नागपुरचे क्षेत्रीय अधिकारी चंद्रशेखर यांनी या रेल्वे अंडर पासची लांबी 265 मीटर असून यामुळे उत्तर व पश्चिम नागपुरला कनेक्टिव्हिटी निर्माण झाली असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास झिंगाबाई टाकळी प्रभागातील नगरसेवक, महानगरपालिकेचे पदाधिकारी, व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.