नागपूर: मागील काही दिवसांपासून विदर्भ राज्य निर्मितीबाबतच्या सर्व आयामांवर चर्चा सुरू आहे. विदर्भ निर्मिती करण्याकरीता सामान्य जनतेला काही समस्या नाहीत. समस्या राजकीय नेत्यांना आहे. त्यांच्यासाठी विदर्भ ही असुविधेची बाब असल्यामुळे ते विरोध करीत आहेत. भाजपाच्या नेत्यांनी दिलेले वचन पाळले नाही. राजकीय नीतीमत्तेवर विश्वास असलेल्यांनी अशाप्रकारे जनतेचा विश्वासघात करणे बरोबर नाही, असा घणाघाती आरोप बहुजन रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक डॉ. सुरेश माने यांनी करीत वेगळ््या विदर्भाला पाठिंबा जाहीर केला.
विदर्भाच्या निर्मितीसाठी १ मे रोजी होणाºया आंदोलनात बहुजन रिपब्लिकन पार्टी विदर्भ राज्य आंदोलन समितीसोबत राहणार आहे. पावसाळी अधिवेशनात पाच मागण्यांचे पाच लाख लोकांच्या सह्या असलेले निवेदन पार्टी मुख्यमंत्र्यांना देणार असून त्यातला मुख्य मुद्दा विदर्भाचा आहे असेही त्यांनी सांगितले. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात सोमवारपासून सुरू असलेल्या दुसºया राष्ट्रीय अधिवेशनाचा समारोप मंगळवारी झाला. व्यासपीठावर बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे संस्थापक अॅड. सुरेश माने, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले, अॅड. वामनराव चटप, मुख्य संयोजक राम नेवले व कोअर कमिटी सदस्यांची उपस्थिती होती.
डॉ. श्रीनिवास खांदेवाले म्हणाले, गेल्या साठ दशकात नवे उद्योग विदर्भात आले नाही. हे सरकार आल्यानंतर काहीतरी विकास होईल, असे वाटले होते. पण तसे झाले नाही. हमारी भूल, कमल का फूल असे लोक आता म्हणू लागले आहेत असा आरोप त्यांनी केला. संयोजक राम नेवले यांनी ठरावाचे वाचन केले. सभागृहाने एकुण आठ ठराव यावेळी एकमताने पारित केले. अॅड. वामनराव चटप यांनी समारोपीय भाषण केले. ते म्हणाले, विदर्भातील ज्वलंत समस्यांवर आतापर्यंत विचारविमर्श झाले. आंदोलने लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आपण त्यात किती यशस्वी झालो याचाही लेखाजोखा मांडला. समारोपीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप भोयर यांनी केले. सरतेशेवटी विदर्भाची प्रतिज्ञा घेण्यात आली.
१ मे ला विदर्भ मार्च
विदर्भाची निर्मिती करण्यासाठी आंदोलन तीव्र करण्यात येणार असून १ मे रोजी नागपूरच्या विधानभवनावर विदर्भाचा झेंडा लावण्यात येणार आहे. या दिवशी यशवंत स्टेडीअम येथून विधानभवनावर विदर्भ मार्च काढण्यात येणार आहे. या आंदोलनात विदर्भातील जनतेने, विदर्भवाद्यांनी, बेरोजगार, महिला, व्यापारी, उद्योजकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राम नेवले यांनी केले.